महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी नागपूरमध्ये नागपूर सुधार प्रन्यास कार्यालयात घुसून धुमाकूळ घातला.
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चर्चेचा विषय बनलेली आहे. त्यातच, मराठी भाषेचा मुद्दा आणि मनसेच्या विविध प्रकारांमुळे राज्याच्या राजकारणात चुरस वाढली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या वेळीदेखील मनसेच्या कार्यकर्त्यांनी गदारोळ निर्माण केला होता. तेव्हापासून त्यांचा विरोधी पक्षांतर्गत आरोप चांगलाच गडद होऊ लागला. गेल्या काही महिन्यांपासून मनसेचे कार्यकर्ते अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालतांना दिसत आहेत. अश्यातच 31 जुलै 2025 रोजी, उपराजधानी नागपूरमध्ये या कार्यकर्त्यांनी एक मोठा हंगामा घातला.
नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) कार्यालयात घुसून, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सुरेश चव्हाण यांच्यावर काळी शाई फेकली आणि त्यांना खुलेआम निषेध नोंदवला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा विरोध जाहीरपणे केला, कारण सुरेश चव्हाण यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत. 2014 मध्ये एनआयटीमध्ये त्यांची नियुक्ती झाल्यापासूनच चव्हाण यांच्यावर लाचखोरी आणि जनहिताच्या कामांमध्ये गडबडीचे आरोप अनेक वेळा उठले आहेत. आरोपानुसार, चव्हाण यांनी पट्टा मंजुरीसाठी २५ हजार रुपये आणि डिमांड नोट जारी करण्यासाठी १२ लाख रुपयांची मागणी केली होती.
Devendra Fadnavis : धरणांच्या कुशीतून शेतकऱ्यांच्या हृदयात संपन्नतेची नदी
प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न
2023 मध्ये, मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली, एनआयटी कार्यालयासमोर भ्रष्टाचारविरोधी मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये एनआयटी प्रशासनाला चव्हाण व इतर काही अधिकाऱ्यांविरोधात दस्तऐवजीय पुरावे सादर करण्यात आले होते. परंतु, मनसे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की प्रशासनाच्या कारवाईतून कधीही ठोस बदल झालेला नाही. सुरेश चव्हाण यांना दोषी ठरविण्याच्या प्रक्रियेत अजूनही पारदर्शकता नाही. प्रशासन त्यांना संरक्षण देत असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे. यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी अधिक तीव्र झाली आहे. या प्रकरणामुळे एनआयटी प्रशासनाची भूमिका वादाच्या घेऱ्यात आली आहे.
सुरेश चव्हाण यांची बदली दक्षिण नागपूर विभागात करण्यात आली होती. मात्र त्यांची पुन्हा पूर्व नागपूर विभागात नियुक्ती केली गेली आहे. प्रशासनाच्या या निर्णयावर मनसेने गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. त्यांचा असाही आरोप आहे की, अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण देऊन प्रशासन त्यांची मनमानी चालू ठेवत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी चव्हाण यांच्यावर शाई फेकली आणि त्यांना विरोध म्हणून हार घालून निषेध केला. पोलिस विभाग आणि एनआयटी प्रशासन सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. ज्यात भ्रष्टाचाराची शंका घेणाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.