नागपूरमधील बारमध्ये मद्यपान करताना सरकारी फायलींवर सही करताना उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के यांचा व्हिडीओ व्हायरल.
नागपूरच्या एका नामांकित बारमध्ये सरकारी कागदपत्रांवर सही करताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि महाराष्ट्राच्या प्रशासनात एकच खळबळ उडाली. चामोर्शी (जिल्हा गडचिरोली) येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के हे नागपूरमधील कीर्ती बार अँड रेस्टॉरंटमध्ये मद्यपान करताना आणि त्याचवेळी महाराष्ट्र शासनाच्या गोपनीय फायलींवर सह्या करताना सापडले. या प्रकाराचा व्हिडीओ आणि सीसीटीव्ही फुटेज समाजमाध्यमांवर झपाट्याने पसरला.
परिणामी, शासनाने तत्काळ हालचाल करत संबंधित अधिकाऱ्याला निलंबित केले. या घटनेनंतर, प्रशासनातील गळका बंद करण्यासाठी सरकारकडून चौकशीचे आदेश दिले गेले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाची सखोल तपासणी करण्याचे निर्देश दिले आहे. गडचिरोली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यांनीही अधिकाऱ्याच्या निलंबनाची पुष्टी केली आहे. या प्रकारावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे विधिमंडळ नेते व आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर थेट टीका केली. हा प्रकार म्हणजे केवळ एका अधिकाऱ्याची चूक नव्हे, तर संपूर्ण संस्थात्मक व्यवस्थेचा दोष आहे, असे ते म्हणाले.
Shalartha Id Scam : नागपूरचे दोन शिक्षणाधिकारी अखेर चौकशीच्या पिंजऱ्यात
निलंबन पुरेसं नाही
विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला की, दारूच्या नशेत शासकीय फायली बारमध्ये तपासल्या जातात आणि त्यावर सह्या केल्या जातात, ही स्थिती भीतीदायक नाही का? वडेट्टीवार यांनी सरकारला थेट आव्हान देताना सांगितले की, फक्त निलंबन करून काही उपयोग नाही. या अधिकाऱ्याला सेवेतूनच बडतर्फ करा. म्हणजे इतर अधिकारी असा गाफीलपणा करण्यास दहादा विचार करतील. तसेच त्यांनी यामागच्या फायलींची चौकशी होण्याची मागणी केली आहे. त्या फायली कोणत्या होत्या? कोणाच्या मंजुरीसाठी आल्या होत्या? अधिकारी त्या बारमध्ये कसा पोहोचला?
वडेट्टीवारांनी आणखी एक मुद्दा मांडला आहे की, या प्रकरणात विशेष म्हणजे ज्या जिल्ह्यात हे सुरू आहे, त्या जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः मुख्यमंत्री आहेत. ते म्हणाले, हे पाहून वाटते की शासनाचे नियंत्रण सुटले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग भ्रष्टाचाराचे कुरण बनला आहे. या घटनेनंतर प्रशासनाच्या पारदर्शकतेवर आणि शासकीय कामकाजाच्या पवित्रतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासकीय फायली या गोपनीय असतात. त्या सार्वजनिक ठिकाणी. तेही मद्यप्राशन करताना हाताळल्या जाणे, हे अत्यंत गंभीर शिस्तभंग मानले जाते. या प्रकरणामुळे केवळ एक अधिकारी नाही, तर पूर्ण प्रशासन व्यवस्थेच्या जबाबदारीवर संशय निर्माण झाला आहे. सरकारच्या गुप्त आणि संवेदनशील दस्तऐवजांबाबत असलेली बेफिकिरी ही चिंतेची बाब आहे.
Akola Politics : भाजपचा किल्ला हादरवणारे ‘अभय’ काँग्रेसच्या नजरेआड