मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या निवडणूक चोरीच्या आरोपांवर जोरदार पलटवार करत राहुल गांधींच्या वक्तव्यांना खोटे आणि राजकीय कव्हर फायरिंग असल्याचा दावा केला.
2024 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने अनेक ठिकाणी विजयाचा झेंडा रोवला होता. मोठ्या संख्येने जागा आपल्या नावावर नोंदवल्या होत्या. मात्र, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी काँग्रेसची आत्मविश्वासाची हवा अचानक फिकी पडल्याचे स्पष्ट झाले. महायुतीने महाविकास आघाडीला मागे टाकत सत्ता आपल्या ताब्यात घेतली. ज्यामुळे काँग्रेसकडून सतत निवडणुकीत मत चोरी झाल्याचा आरोप जोर धरू लागला. या आरोपांवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 7 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोग आणि भाजपवर थेट गंभीर आरोप करत मतदार यादीतील गडबडीचा पर्दाफाश केला. त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील मतदार यादीत लाखो बनावट नावे असल्याचा दावा केला. ज्यामुळे निवडणूक प्रभावित झाल्या, असा आरोप त्यांनी मांडला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर जोरदार पलटवार करत म्हटले की, महाराष्ट्रात किंवा देशात कुठेही मतदानाची चोरी झालेली नाही. राहुल गांधी यांच्या डोक्यातील चीप चोरीला गेली आहे, असं ते म्हणाले. देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर सतत खोटे बोलण्याचा आरोप करत, ते निवडणुकीत अपयश पाहत असल्यामुळे आधीच कव्हर फायरिंग करत असल्याचा दावा केला. फडणवीस म्हणाले, राहुल गांधी यांना माहित आहे की त्यांची राजकीय जमीन संपलेली आहे. आगामी निवडणुकीत त्यांना निवडून येता येणार नाही. त्यामुळे ते सतत असे आरोप करत आहेत. त्यांनी या आरोपांना पूर्णपणे खोडून काढत राहुल गांधींच्या वक्तव्यांना धोका म्हणून पाहिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मतदार यादीत काही प्रॉब्लेम असल्याच्या आरोपांवर प्रश्न उपस्थित करत म्हटले, जर मतदार यादीत समस्या असेल, तर त्यासाठी पुनरावलोकन करणेच योग्य पर्याय आहे.
निवडणूक प्रक्रिया प्रामाणिक
राहुल गांधी मात्र त्याला विरोध करत आहेत, हेच आश्चर्यकारक आहे. त्यांनी बिहारमध्ये निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मतदार यादी पुनरावलोकनावर देखील राहुल गांधींचा विरोध करण्याचाही उल्लेख केला. देवेंद्र फडणवीसांच्या मते, मतदार यादी सुधारण्यासाठी योग्य पद्धतीने काम करणे गरजेचे आहे. या प्रक्रियेत कोणत्याही राजकीय पक्षाला अडथळा आणण्याचा अधिकार नाही. मतदार यादीची स्वच्छता आणि विश्वासार्हता ही लोकशाहीची पाया आहे, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात आणि देशभरात निवडणूक प्रक्रिया प्रामाणिकपणे पार पडल्याचा दावा करताना, देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींच्या वक्तव्यांना आराजकता निर्माण करण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप केला.
राहुल गांधी लोकशाहीवरचा लोकांचा विश्वास कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा हेतू फक्त राजकीय लाभ मिळवण्याचा आहे, अशी त्यांची भूमिका आहे. देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की, निवडणुकीत कोणतीही चुक झाली नाही. यंत्रणा पूर्णपणे सुरक्षित आहे. राहुल गांधी सतत यंत्रणेची बदनामी करत आहेत. ते केवळ राजकीय फसवणूक करत आहेत, असेही त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि महायुतीमध्ये सत्ता संघर्षाला नवे वळण आले आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या आरोपांना जबरदस्त रितीने फेटाळून टाकले आहे. ते म्हणतात, जेव्हा निवडणुकीतून पराभव ठरतो, तेव्हा विरोधी पक्षाला आरोप करून परिस्थिती हाताळावी लागते. पण राजकीय नैतिकतेचा भाग म्हणून सत्य स्वीकारणे अधिक गरजेचे आहे.