नागपूर-कोलकाता इंडिगो फ्लाइटला उड्डाणानंतर पक्ष्याने जोरदार धडक दिली. वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे विमान आपत्कालीन लँडिंग करून अनेक प्रवाशांचा जीव वाचला.
सुरक्षा हीच आमची जबाबदारी अशा गाजावाजा करणाऱ्या एअरलाईन्सच्या जाहिराती नेहमी लोकांचे लक्ष वेधून घेतात. परंतु प्रत्यक्ष प्रवासात या दाव्यांची खरी कसोटी लागते. नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ( 2 सप्टेंबर रोजी) सकाळी घडलेली घटना याचेच ताजे उदाहरण ठरली. इंडिगो एअरलाइन्सचे विमान आकाशात झेप घेतल्यानंतर काही क्षणांतच पक्ष्याच्या धडकेमुळे परत लँडिंग करावे लागले. कोलकाताच्या दिशेने आकाशात झेपावलेले इंडिगोचे विमान (6E 812) अवघ्या काही मिनिटांतच पुन्हा जमिनीवर परतले. कारण एका मोठ्या घारीने विमानाला जोरदार धडक दिली होती. ही धडक इतकी मोठी होती की विमानाचा पुढील भाग चक्क चपटा झाला. पण वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे आणि तात्काळ घेतलेल्या निर्णयामुळे 272 प्रवाशांचे प्राण वाचले.
प्रवाशांमध्ये माजी आमदार सुधाकर कोहळे, काँग्रेसचे सहसचिव नितीन कुंभलकर आणि शेखर भोयर यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश होता. सकाळी 7:05 वाजता विमानाने उड्डाण केले आणि जयताळा परिसरातून अवघ्या अर्धा ते एक किलोमीटर अंतर कापताच हा अनपेक्षित प्रकार घडला. आकाशातून वेगाने झेपावणाऱ्या विमानाला अचानक पक्ष्याने धडक दिली. वैमानिकाने तत्काळ एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला आणि अवघ्या 8 ते 10 किलोमीटर अंतरावरून विमान परत फिरवले. आपात्कालीन लँडिंग करताना वैमानिकाने दाखवलेल्या शांतपणामुळे सर्व प्रवासी सुखरूप जमिनीवर उतरले. पण हा थरार इथेच थांबला नाही. विमानतळावर उतरल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. विमानतळावर उतरल्यानंतर इंडिगो एअरलाइन्सने तात्काळ या घटनेची माहिती जाहीर केली.
Sunil Funde : मुख्यमंत्र्यांशी पहिल्या भेटीत उघडला प्रगतीचा खजिना
भविष्यातील उपाययोजना गरजेच्या
विमानाला पक्षी धडकल्यामुळे त्याची तपासणी आणि दुरुस्ती आवश्यक असल्याने फ्लाइट रद्द करण्यात आली. प्रवाशांना पर्यायी व्यवस्था देण्यात आली. काहींनी पुढील प्रवासासाठी दुसरे विमान निवडले, तर काहींनी पैसे परत घेण्याचा पर्याय स्वीकारला. ज्यांचा प्रवास उशिरा होता, त्यांच्यासाठी अल्पोपहाराची सोयही करण्यात आली. सुधाकर कोहळे यांनी सांगताना म्हटले, विमान उडाल्यानंतर काही मिनिटांतच वैमानिकाने आपात्कालीन लँडिंगची घोषणा केली. त्या क्षणी सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. पण वैमानिकाच्या कौशल्यामुळे आम्ही सुखरूप उतरलो. विमानांना पक्ष्यांच्या धडकण्याच्या घटना नव्या नाहीत, पण त्याचे परिणाम गंभीर असू शकतात. यापूर्वीही अशा घटनांमुळे मोठे अपघात झाले आहेत. जून महिन्यात एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन विमानाला झालेल्या अपघातानंतर विमानप्रवासाबाबत भीतीचे वातावरण आहे.
अशातच नागपूरच्या या घटनेने विमानतळावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आणला आहे. नागपूर विमानतळावर यापूर्वीही पक्षी आणि प्राण्यांमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. काही वर्षांपूर्वी धावपट्टीवर भटकी कुत्री, डुक्कर आणि मोरांचा थवा फिरताना दिसायचे. 2015 मध्ये तर तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या विमानासमोर डुकरांची फौज उभी राहिली होती. तेव्हापासून विमानतळ प्रशासनाने विशेष काळजी घेण्यास सुरुवात केली. पक्षी आणि प्राण्यांमुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या. तरीही अशा घटना पूर्णपणे थांबलेल्या नाहीत. या घटनेने पुन्हा एकदा विमानतळावरील सुरक्षाव्यवस्थेकडे लक्ष वेधले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विमानतळ प्रशासन आणि एअरलाइन्स कंपन्यांना अधिक कठोर पावले उचलावी लागतील. वैमानिकाच्या सतर्कतेमुळे हा प्रसंग सुखरूप पार पडला, पण भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे.
Manoj Jarange : कुणबी प्रमाणपत्राने उघडले मराठा समाजासाठी नवे दरवाजे
