भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांच्यावर अपमानास्पद शब्दांत टीका केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या वादांचे वारे वाहत आहे. एकेकाळी सुसंस्कृत आणि वैचारिक चर्चांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या राज्याचे राजकारण आता अपशब्द आणि वैयक्तिक हल्ल्यांच्या गर्तेत लोटले जात आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेने या अधोगतीला नवे परिमाण दिले आहे. पडळकरांनी जयंत पाटील यांच्या वडिलांवर वैयक्तिक हल्ला चढवत अत्यंत खालच्या पातळीचे शब्द वापरले. ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.
पडळकरांचे हे वक्तव्य म्हणजे केवळ वैयक्तिक हल्ला नव्हे, तर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला काळिमा फासणारी घटना आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांनी समृद्ध असलेल्या या भूमीत अशा प्रकारची भाषा आणि वर्तनाला थारा नसल्याचे मत माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी पडळकरांना महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला गढूळ करणारी किड संबोधत तीव्र निषेध नोंदवला. देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांना या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मतभेद नेहमीच होते, पण मनभेद कधीच नव्हते.
जयंत पाटीलांचा ठसा
सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील वाद विकासाच्या मुद्द्यांवर केंद्रित असायचे. मात्र, गेल्या काही वर्षांत राजकारणात कटुता वाढत आहे. विरोधकांना संपवण्याच्या मानसिकतेतून सत्ताधारी अशा विकृत वक्तव्यांना खतपाणी घालत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला. पडळकरांनी जयंत पाटील यांना बिनडोक आणि त्यांच्या वडिलांबद्दल अपमानास्पद शब्द वापरताना कोणतीही मर्यादा ठेवली नाही. जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औलादच वाटत नाहीत, असे पडळकरांचे वक्तव्य म्हणजे राजकीय संस्कृतीचा अवमान आहे. जयंत पाटील हे सांगलीच्या राजकारणातील दिग्गज नेते. त्यांनी अनेक खात्यांचे मंत्रिपद सांभाळताना आपल्या कामगिरीने ठसा उमटवला आहे. सांगलीत एकेकाळी त्यांचे वर्चस्व निर्विवाद होते.
मागील विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रभावाला तडा गेला आणि त्याचवेळी पडळकरांशी त्यांचा वाद चव्हाट्यावर आला. या वादाने आता वैयक्तिक शेरेबाजीचे रूप घेतले आहे. पडळकरांच्या या वक्तव्याने राजकीय चर्चा गल्लीतील भांडणाच्या पातळीवर गेल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली.अनिल देशमुख यांनी या प्रकरणावर बोलताना भविष्याची चिंता व्यक्त केली. जर अशा विकृत वक्तव्यांना वेळीच आळा घातला नाही, तर राजकारणाचा स्तर इतका खालावेल की सामान्य नागरिकांचा राजकारण्यांवरील विश्वास उडेल, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या राजकारणाने नेहमीच देशाला दिशा दाखवली आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील शाब्दिक युद्धाने ही परंपरा धोक्यात आली आहे.
Nagpur : जिल्हा परिषदेच्या आरक्षण रोटेशनला न्यायालयाची हिरवी झेंडी
पडळकरांसारख्या नेत्यांच्या वक्तव्यांमुळे राजकारणाबद्दल जनतेचा दृष्टिकोन बदलण्याची भीती आहे. या घटनेने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून, सर्वच स्तरांतून यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. सत्ताधाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा, महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय वारशाला कायमचा तडा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.