राज्यभरात प्रीपेड मीटरचा विरोध वाढला आहे. परंतु वीज चोरी करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी सरकारने प्रीपेड मीटर लावण्यास सुरुवात केली आहे.
राज्यात वीज चोरी रोखण्यासाठी सरकार आणि वीज वितरण कंपन्यांनी ठोस पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून लवकरच ग्राहकांसाठी प्री-पेड वीज मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. या नव्या उपक्रमामुळे वीज चोरीला आळा बसणार आहे. वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांवर देखील नियंत्रण ठेवता येणार आहे. मात्र, अनेक ठिकाणी या प्री-पेड मीटरला तीव्र विरोध होताना दिसत आहे. या विरोधामागे वीज चोरी करणारे, थकबाकीदार आणि काही राजकीय तसेच प्रशासनातील लोक असल्याची चर्चा आहे.
राज्यात दरवर्षी कोट्यवधी रुपयांची वीज चोरी होत असते. काही लोक बेकायदेशीररित्या वीज जोडणी घेतात, तर काही जण विजेचे मीटर बायपास करून अनधिकृत वीज वापरतात. यात उद्योग, कारखाने, दुकाने, हॉटेल्स यांच्यासह काही मोठमोठ्या गृहनिर्माण संकुलांचाही समावेश आहे. सर्वसामान्य नागरिक वेळेवर वीज बिल भरत असताना काही लोक मात्र वीज बिले भरत नाहीत किंवा अनधिकृतरित्या वीज वापरतात. यामुळे वीज वितरण कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक तोटा सहन करावा लागतो.
प्री-पेड मीटरमुळे काय होणार?
नवीन प्री-पेड मीटर प्रणालीमुळे ग्राहकांना वीज वापरण्यापूर्वी पैसे भरावे लागतील. जसे की आपण मोबाईलमध्ये रिचार्ज करून बोलतो. जर ग्राहकाने रिचार्ज केला नाही, तर वीजपुरवठा आपोआप बंद होईल. यामुळे थकबाकीदारांकडून वेळेवर पैसे मिळतील आणि वीज चोरी करणाऱ्यांवर आळा बसेल. ही व्यवस्था लागू झाल्यानंतर अनधिकृत वीज वापरणे कठीण होईल. कारण मीटरमध्ये कोणताही फेरफार करता येणार नाही.
प्री-पेड मीटर लागू करण्यास काही ठिकाणी मोठा विरोध होत आहे. विरोध करणाऱ्यांमध्ये फक्त सामान्य नागरिकच नाहीत, तर काही उद्योगपती, व्यापारी, नेते आणि सरकारी अधिकारीही असल्याची चर्चा आहे. अनेक वर्षांपासून काही लोक बेकायदेशीररित्या वीज वापरत आहेत. मोठी थकबाकी असूनही वीज जोडणी तोडली जात नाही. आता प्री-पेड मीटर बसवल्यास हे सगळे प्रकार थांबतील. त्यामुळेच विरोधकांना हा बदल नकोसा वाटत आहे. काही ठिकाणी आंदोलनेही होत असून, प्री-पेड मीटर लावण्यास आक्षेप घेतला जात आहे.
सामान्य नागरिकांचे मत
सामान्य नागरिक मात्र या उपक्रमाचे स्वागत करत आहेत. “आम्ही वेळेवर वीज बिले भरतो, मग काही लोक बेकायदेशीररित्या वीज वापरतात आणि त्यांचे काहीच होत नाही, हे चुकीचे आहे. त्यामुळे प्री-पेड मीटर हा योग्य निर्णय आहे,” असे अनेक ग्राहकांचे मत आहे.
राज्य सरकार आणि वीज वितरण कंपन्या मात्र या विरोधाला झुकणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. लवकरच सर्व घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी प्री-पेड मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू होईल. सुरुवातीला काही भागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवली जात आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यात अंमलबजावणी होईल.
वीज चोरी हा गंभीर विषय असून, यामुळे इमानदारीने वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांवरही आर्थिक भार येतो. प्री-पेड मीटर प्रणाली लागू झाल्यास वीज चोरीला आळा बसेल. वीज वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक बनेल. त्यामुळे या निर्णयाला विरोध करण्यापेक्षा सर्वांनी मिळून या प्रणालीला पाठिंबा द्यावा, असे मत वीज तज्ञ आणि ग्राहक व्यक्त करत आहेत.
