महाराष्ट्र

Shiv Sena : ठाकरे बाप बेटे म्हणाले, अर्थसंकल्प फसवा 

Maharashtra Budget Session : भांडवलशाहीला चालना पण मराठी उद्योजकांना मदतीचा अभाव

Post View : 16

Author

महायुती सरकारच्या अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा झाल्या, पण वास्तवात आश्वासनांची पूर्तता शून्य. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी या अर्थसंकल्पाला थेट फसवा म्हणत सरकारवर जोरदार टीका केली.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारच्या अर्थसंकल्पावर तीव्र टीका केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे फक्त आश्वासनांचा बाजार असून, प्रत्यक्षात जनतेसाठी काहीही नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, हा सरकारचा अर्थसंकल्प नाही, तर ठरावीक उद्योगपती आणि ठेकेदारांसाठी सोन्याची अंडी देणारा कोंबडा आहे.

महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे मोठे आश्वासन दिले होते, मात्र अर्थसंकल्पात त्याचा उल्लेखही नाही. उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधत म्हटले की, हे सरकार निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने निवडून आले आहे, जनतेच्या मतांनी नाही. त्यामुळेच त्यांना शेतकऱ्यांची कोणतीही काळजी नाही.

कोट्यवधींचा खोटा आकडा

आदित्य ठाकरे यांनी सरकारला जाब विचारला की, महिलांसाठी एकवीसशे रुपयांची मदतीची घोषणा केली होती, मग आता ती कुठे गेली? निधीची कपात करून महिलांचे स्वप्न सरकारने चुरडले आहे. सरकारला महिलांचे खरंच कल्याण करायचे असते, तर या योजनेला प्राधान्य दिले असते, असे आदित्य ठाकरेंचे म्हणणे आहे.उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करताना सांगितले की, मुंबईसाठी जाहीर केलेले ₹64 हजार कोटींचे प्रकल्प नवीन नाहीतच. आधीच सुरू असलेले प्रकल्प उचलून सरकारने मोठा आकडा दाखवला आहे. आदित्य ठाकरे यांनी यावर भर देत म्हटले की, हे सरकार फक्त आकड्यांचा खेळ करून मुंबईकरांची दिशाभूल करत आहे.

Nagpur Zilla Parishad : तंत्रज्ञानाच्या दिशेने दमदार पाऊल

अदानींना फायदा

मुंबईतील व्यापार केंद्रांसाठी सरकारने मोठ्या घोषणा केल्या, पण त्यात कोणताही स्पष्ट आराखडा नाही. आदित्य ठाकरे यांनी विचारले, गुजरातच्या GIFT सिटीला सरकार विशेष सवलती देते, मग मुंबईला का नाही?हे सरकार महाराष्ट्राला दुर्लक्षित करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुंबईतील दोन विमानतळांना जोडणारा मेट्रो प्रकल्प सरकारने मंजूर केला. मात्र, उद्धव ठाकरेंच्या मते, हे दोन्ही विमानतळ अदानी समूहाच्या मालकीचे असताना हा प्रकल्प सरकारच्या तिजोरीतून का? आदित्य ठाकरे यांनी हेच पुढे नेले आणि सरकारवर खळबळजनक आरोप करत म्हटले की, सरकार जनतेच्या पैशाने अदानी समूहाची सेवा करत आहे.

भगवेकरणाचा डाव

अनेक स्मारकांच्या घोषणा करण्यात आल्या, पण अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा कुठेही उल्लेख नाही. उद्धव ठाकरे म्हणाले, 2017 मध्ये जलपूजनाचा दिखावा करून भाजपने शिवभक्तांची फसवणूक केली. आता त्यावर काहीही भाष्य न करता हा विषय गाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मराठी भाषा सप्ताहासाठी कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांना आमंत्रित करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. मराठीच्या नावाखाली सरकार आपले राजकीय अजेंडा रेटत आहे, ही मुंबईकरांची आणि मराठी माणसाची घोर फसवणूक आहे,असे ते म्हणाले.

ठाकरे बाप-बेटे संतापले

उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत सांगितले की, अर्थसंकल्पात जनतेसाठी काहीही नाही, फक्त ठरावीक व्यावसायिकांसाठी आहे. त्यांनी सरकारला आव्हान दिले की, जर हा अर्थसंकल्प जनतेसाठी आहे, तर एक तरी योजना आजपासून लागू करा. पण तसे होणार नाही, कारण सगळे फक्त कागदावर आहे.उद्धव ठाकरेंनी सरकारवर शेवटचा घणाघात करत म्हटले, ही महायुती नव्हे, ठेकेदारांची युती आहे. महाराष्ट्रातील जनता सरकारला सडेतोड उत्तर देईल. आदित्य ठाकरे म्हणाले, हे सरकार आश्वासनांवर चालते, प्रत्यक्षात काहीही करत नाही. लोकांनी डोळे उघडून पाहावे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!