महाराष्ट्र

NCP : दादा कोणाला संधी देणार अन् कोणाला डावलणार ?

Mahayuti : विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीसाठी खुलणार कुणाचे नशीब

Post View : 18

Author

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटात उमेदवारीसाठी चूरस सुरू झाली आहे. झीशान सिद्दीकी आणि संग्राम कोते पाटील यांची नावे सध्या आघाडीवर आहेत. तर या दोघांपैकी कोणाचे नशीब खुलणार, यावर सर्वांचे लक्ष आहे. 

महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर पुन्हा एकदा विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने चुरस रंगताना दिसत आहे. काही दिवसांत होणाऱ्या या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपापल्या रणनीती ठरवण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः भाजपने आपल्या तीन बळकट नेत्यांची यादी जाहीर करत निवडणुकीच्या मैदानात जोरदार एंट्री घेतली आहे. दुसरीकडे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही हालचालींना वेग आला आहे. पक्षाने उमेदवारी निश्चित करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहे.  झीशान सिद्दीकी आणि संग्राम कोते पाटील यांची नावे सध्या चर्चेत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात विधान परिषद निवडणुकीसाठी इच्छुकांची रांग लागली असली, तरी या दोन नेत्यांची नावे सध्या आघाडीवर असल्याचे दिसते. विशेष म्हणजे, या दोघांचेही पक्षासाठी योगदान आणि त्यांची सामाजिक ताकद पक्षासाठी महत्त्वाची ठरणारी आहे. त्यामुळे झीशान सिद्दीकी आणि संग्राम कोते पाटील यांच्यापैकी कोणाचे नशीब खुलणार, यावर सर्वांचे लक्ष आहे.

NCP Politics : महायुतीतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाची तातडीची बैठक

प्रभावशाली चेहरे 

झीशान सिद्दीकी हे अल्पसंख्यांक समाजाचे प्रतिनिधित्व करणारे उमेदवार आहेत. त्यांचे वडील तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे अल्पसंख्यांक समाजाच्या भावना झीशान सिद्दीकी यांच्या बाजूने प्रबळ झाल्या आहेत. झीशान यांचे विशेषतः मुंबई परिसरात भक्कम वर्चस्व आहे. त्यामुळे अल्पसंख्यांक समाजाचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आणि मुंबईतील मतदारसंघ मजबूत करण्यासाठी झीशान सिद्दीकी यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वाऱ्यासारखी पसरली आहे.

दुसरीकडे, संग्राम कोते पाटील हे अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू मानले जातात. संग्राम कोते पाटील शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे ट्रस्टी होते. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदही त्यांनी यशस्वीरित्या सांभाळले असून, तरुणाईत त्यांचा चांगला प्रभाव आहे. संग्राम कोते पाटील यांनी कधीही पदासाठी आपली इच्छा व्यक्त न करता पक्षासाठी निष्ठेने काम केले आहे. त्यामुळे अनेक युवा कार्यकर्त्यांचे आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचे मत आहे की, आता संग्राम कोते पाटील यांना विधान परिषद उमेदवारी दिली पाहिजे.

उमेदवारी लढत 

संग्राम कोते पाटील यांना जर संधी मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरातील तरुणांमध्ये प्रभाव वाढू शकतो. त्यांची साद आणि कार्यपद्धती पाहता अजित पवार यांच्यासाठी ते एक मजबूत शस्त्र ठरू शकतात. याऊलट अल्पसंख्यांक समाजाच्या नाराजीचा मुद्दा लक्षात घेऊन झीशान सिद्दीकी यांना संधी देण्याचा निर्णय घेतला, तर त्याचा थेट फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळू शकतो. झीशान सिद्दिकी आमदार झाले, तर अल्पसंख्यांक समाज या एकमेव फॅक्टरला खुश करण्यात अजित पवारांना यश मिळेल.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 16 मार्च रोजी दुपारी 1 वाजता महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीतच विधान परिषद निवडणुकीसाठी अंतिम उमेदवारांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे झीशान सिद्दीकी की संग्राम कोते पाटील यापैकी कोणाला संधी मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या दोघांपैकी कोणाची उमेदवारी निश्चित होईल, कोणाचा राजकीय डाव फसलेला ठरेल, आणि कोण विजयाची कुंडी फोडणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपसह इतर पक्षांचेही डोळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयावर असतील.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!