चंद्रपूरच्या रस्त्यांवर जणू काही चंद्रावरील खड्डे उतरवले आहेत, इतकी दयनीय अवस्था झाली आहे. चंद्रावर खड्डे असावेत तसेच खड्ड्यांचे साम्राज्य चंद्रपूरमध्येही नागरिकांना त्रास देत आहे. यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक संदीप पोशट्टीवार यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना टोला लगावला आहे.
चंद्रपूर शहराच्या सौंदर्यवर्धन आणि पायाभूत सुविधांसाठी कोट्यवधींच्या निधीने रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली. मात्र, अमृत पाणी पुरवठा योजना व भूमिगत गटार योजनेच्या नावाखाली डांबरी आणि सिमेंटचे रस्ते फोडून शहरात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यांवर सर्वत्र मोठमोठे खड्डे, उखडलेले भाग आणि प्रचंड धुळीचा त्रास यामुळे नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. या दुरवस्थेकडे महापालिकेसह स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, आजी-माजी पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केले असल्याची तीव्र टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक संदीप पोशट्टीवार यांनी केली आहे. त्यांनी थेट समाजमाध्यमांवर लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचे कान टोचत, ‘दुचाकीने शहराचा फेरफटका मारा आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्येचा प्रत्यक्ष अनुभव घ्या,’ असे आव्हान दिले आहे.
गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेत प्रशासक राज सुरू आहे. शहराच्या विकासासाठी अनेक कोट्यवधींचे प्रकल्प मंजूर करून कामे हाती घेण्यात आली. डांबरी व सिमेंटचे रस्ते नव्याने तयार करण्यात आले; पण गेल्या सहा महिन्यांत अमृत पाणी पुरवठा योजना व भूमिगत गटार योजनेसाठी हेच रस्ते उखडण्यात आले. जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असतानाच, काम पूर्ण झालेल्या भागात खड्डे बुजवण्याकडे आणि रस्ते पूर्ववत करण्याकडे महापालिकेने पाठ फिरवली आहे. परिणामी, चंद्रपूर शहराचे रस्ते खड्ड्यांनी भरले गेले असून, धुळीने सर्वत्र धुरळा उडाला आहे. यामुळे नागरिकांना केवळ वाहतुकीचा त्रास नाही, तर आरोग्याच्या समस्या, विशेषतः श्वसन व हृदयविकाराचे संकटही भेडसावत आहे.
Harshwardhan Sapkal : भाजपचे सरकार म्हणजे ‘गँग्ज ऑफ वासेपूर’
अनेक मार्गांचे हाल
विशेषत: महात्मा गांधी मार्ग व कस्तुरबा गांधी मार्गांवरील परिस्थिती बिकट आहे. या मार्गांवर दुचाकी चालवणेही धोकादायक बनले आहे. खड्डे टाळताना अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. नागरिक, व्यापारी, विद्यार्थी व वृद्ध यांना रोजच्या प्रवासात नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्यांची ही दुरवस्था पाहता शहरवासीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नियोजनशून्य कारभार, जनतेच्या पैशांची उधळपट्टी आणि कंत्राटदार-प्रशासनाच्या टक्केवारीच्या साखळीवर जोरदार टीका होत आहे. पोशट्टीवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, पालकमंत्री आणि महापालिका आयुक्त यांना थेट आव्हान दिले आहे. ‘जनतेच्या वेदना समजून घ्यायच्या असतील, तर गाड्या सोडून दुचाकीने या रस्त्यांवरून फिरा,’ असे संदीप पोशट्टीवार यांनी म्हटले आहे. त्यांच्या या टोला मारक विधानामुळे सोशल मीडियावर चर्चेला चांगलाच ऊत आला आहे.
वाढत्या नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रमुख मार्गांची पाहणी केली. त्यांनी तातडीने मंजूर 20 कोटींच्या निधीतून खड्डे बुजवण्याचे आणि रस्त्यांचे डांबरीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. चैत्र नवरात्र यात्रेपूर्वी जटपूरा गेट मार्ग पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. गांधी चौक ते पठाणपुरा आणि आंबेडकर पुतळा ते बिनबा गेट या दोन महत्वाच्या मार्गांचे कामही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
कायमस्वरूपी उपाय हवा’
शहरातील नागरिकांना डागडुजीच्या नावाखाली वारंवार फसवले जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. “पाणीपुरवठा योजना आणि गटार योजना किती दिवस चालणार? दरवेळी रस्ते फोडून पुन्हा उखडलेल्या रस्त्यांचे थोडक्यात काम करून आम्हाला गंडवले जाते,” असा रोष अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. नागरिकांनी आता कायमस्वरूपी दर्जेदार रस्ते आणि योग्य नियोजनाची मागणी केली आहे.
सध्या तरी महापालिकेच्या दुर्लक्षामुळे चंद्रपूरचे रस्ते अक्षरशः मृत्यूचे सापळे बनले आहेत. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे प्रत्यक्ष कृतीतून उत्तर येईल का, की निव्वळ पाहणी दौरे आणि बैठकीपुरतेच हे आश्वासन राहील, याकडे चंद्रपूरकरांचे लक्ष लागले आहे.
