सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथे शंकरपटाचे उद्घाटन करून शेतकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला. बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून त्यांनी बळीराजाच्या मेहनतीचा सन्मान केला.
महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते येतात आणि जातात, पण काही व्यक्तिमत्त्वं आपल्या कर्तृत्वाने आणि लोकांप्रती असलेल्या निष्ठेने वेगळी ओळख निर्माण करतात. असाच एक नेता म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याचा अभिमान, महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार. खुर्ची किंवा मंत्रिपदाच्या मागे न धावता, आपल्या कामातून लोकांच्या मनात स्थान मिळवणारा हा नेता आजही जनतेच्या हितासाठी अहोरात्र झटतो. चंद्रपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी केवळ आपल्या भागापुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाला हातभार लावला आहे. त्यांचा साधेपणा, मनमोकळेपणा आणि शेतकऱ्यांप्रती असलेलं प्रेम यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात.
उच्चशिक्षित असूनही सुधीर मुनगंटीवार यांचे पाय नेहमीच जमिनीवर राहिले आहेत. बळीराजा आणि काळी आई यांच्याबद्दल त्यांच्या मनात असलेली आपुलकी त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येते. नुकतेच त्यांनी शंकरपट या पारंपरिक स्पर्धेत सहभाग घेऊन बैलगाडा हातात घेतला आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतात राबणाऱ्या माणसाच्या मेहनतीला सन्मान देणारा हा नेता आपल्या शब्दांचा पक्का आहे. शेतकऱ्यांना अनुदानाचा शब्द देऊन त्यांनी पुन्हा एकदा आपली बांधिलकी दाखवली. आता हा शब्द कसा पूर्ण होतो, याकडे शेतकरी वर्गाचे डोळे लागले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे शेतकरी बांधवांमध्ये नवीन आशा निर्माण झाली आहे.
Harshwardhan Sapkal : भाजपसाठी संविधान बाजूला, बंच ऑफ थॉट्स पुढे
परंपरेचं जतन
शंकरपटाच्या उद्घाटनावेळी मुनगंटीवारांनी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आपलं मन भरून आल्याचं सांगितलं. ही स्पर्धा शेतकऱ्यांसाठी केवळ मनोरंजन नसून त्यांच्या कष्टाचं कौतुक आहे, असं ते म्हणाले. बैलजोडीचं संगोपन आणि पशुधन संवर्धनासाठी या परंपरेला सरकारचा पाठिंबा मिळावा, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. राज्य सरकारकडे याबाबत ठाम पाठपुरावा करण्याचा विश्वास त्यांनी शेतकरी बांधवांना दिला. सुधीर मुनगंटीवार यांचं हे वचन म्हणजे त्यांच्या लोककेंद्रित दृष्टिकोनाचा आणखी एक पुरावा आहे.
सुधीर मुनगंटीवार यांचं राजकारण हे नेहमीच जनतेच्या हिताला प्राधान्य देणारं राहिलं आहे. नुकतंच त्यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक आणि शिपाई भरती प्रक्रियेत एससी, एसटी, ओबीसी आणि महिला आरक्षण लागू व्हावं, अशी मागणी त्यांनी लावून धरली होती. मंत्रिपद नसतानाही त्यांनी आपल्या मतदारसंघात आणि राज्यभरात विकासकामांना गती दिली आहे . विधानसभेत गाणं गाऊन त्यांनी आपली अनोखी शैलीही दाखवली, पण त्याचवेळी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात ते कधीच मागे हटले नाहीत. विरोधकांनाही त्यांच्या या शैलीमुळे टीका करताना अनेकदा गोंधळून जावं लागतं.
निष्ठेचा संगम
महायुती सरकारसाठी सुधीर मुनगंटीवार हे एक मजबूत आधारस्तंभ आहेत. त्यांचा अनुभव आणि जनतेशी असलेलं घट्ट नातं पक्षाला बळ देतं. ‘मंत्रीपद मिळालं नाही म्हणून मी थांबणार नाही, माझी लढाई जनतेच्या हक्कांसाठी आहे,’ असं ठामपणे दाखवून देणारा हा नेता आपल्या समर्थकांसाठी प्रेरणास्रोत आहे. अधिवेशनात त्यांनी अनेक मुद्द्यांवर सरकारला जाब विचारला आणि आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.
