महाराष्ट्र

Prataprao Jadhav : सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी संपणार, शेतकऱ्यांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार

Buldhana : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची ग्वाही

Post View : 21

Author

बुलढाणा जिल्ह्यातील प्रगतशील युवा शेतकऱ्याने शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या हक्कासाठी बलिदान दिलं. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्यांना हतबल होऊन जीवनयात्रा संपवावी लागली. त्यांच्या मागणीला न्याय मिळवून देण्याची ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी अरमाळ गावातील प्रगतशील युवा शेतकरी कैलास नागरे यांच्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी बलिदान दिले. त्यामुळे पुन्हा एकदा शासनाच्या दुर्लक्षाची व्यथा समोर आली आहे. खडकपूर्णा धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी त्यांनी वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधले, आंदोलन केले. मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आणि कारवाई अभावी, हतबल होऊन त्यांनी विष प्राशन करत शेतातच जीवनयात्रा संपवली.

कैलास नागरे यांच्या रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमानिमित्त, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी नागरे कुटुंबीयांची भेट घेतली. नागरे यांचे वडील अर्जुनराव नागरे यांच्यासह संपूर्ण कुटुंबाला धीर देत, त्यांच्या दु:खात सहभागी झाले. जाधव यांनी ठाम शब्दांत आश्वासन दिले की, कैलासराव यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. त्यांनी सांगितले की, कैलासराव हे प्रयोगशील, शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमी झटणारे शेतकरी होते. त्यांची ही टोकाची कृती दुर्दैवी आहे. परंतु त्यांच्या मागणीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Devendra Bhuyar : पांदन रस्त्यांवर स्थगितीचा फटका

विदर्भाला मिळणार पाणी

मंत्री जाधव म्हणाले, “बुलढाणा व विदर्भातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प मंजूर केला गेला आहे. या प्रकल्पाला राज्य सरकारने 88 हजार 554 कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पातून मंजूर केला आहे. प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी सिंचन सुविधा उपलब्ध होईल, असे जाधव म्हणाले.

मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनीदेखील नागरे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. माध्यमांशी बोलताना त्यांनी शासनावर कडाडून टीका केली. आमदार खरात म्हणाले, “शासनाचा शेतकरी पुरस्कार मिळवलेला एक प्रगतशील, उच्चशिक्षित शेतकरी शेवटी शेतीसाठीच आहुती देतोय, ही बाब शासनाच्या अपयशाची साक्ष आहे. कैलास नागरे यांची ही आत्महत्या नसून, सरकारी व्यवस्थेने त्यांचा बळी घेतला आहे.”

संपूर्ण यंत्रणेची लाज

खरात पुढे म्हणाले, “कैलास नागरे यांच्यासारखे प्रयोगशील शेतकरी, जे शेतीत नवे प्रयोग करून शेतीला नफ्यात आणण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. त्यांना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे असे टोकाचे पाऊल उचलावे लागते, ही बाब संपूर्ण यंत्रणेची लाज आहे. अजून किती कैलास नागरे यांच्या बलिदानानंतर सरकार जागे होईल? राज्यातील सामान्य शेतकऱ्यांची अवस्था काय असेल, याचा विचारही भयावह आहे.”

त्यांनी नागरे कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत व आवश्यक सर्व सहकार्य मिळावे, यासाठी शासनाला आवाहन केले. “ही आत्महत्या नाही, तर ही व्यवस्थेने केलेली हत्या आहे,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी शासनाला सवाल केला.

कैलास नागरे यांच्यासारखे उच्चशिक्षित, मेहनती शेतकरी, ज्यांचे कुटुंब शेतात दिवस-रात्र राबते, जे शेतीत नवनवीन प्रयोग करतात, त्यांनी आपल्या हक्कासाठी जीव दिला हे समस्त शेतकरीवर्गाच्या वेदनांचे प्रतीक ठरत आहे. त्यांच्या मागणीकडे वेळीच प्रशासनाने लक्ष दिले असते, तर कदाचित हे बलिदान टळले असते. आता तरी शासन आणि प्रशासनाने जाग येऊन केवळ घोषणा न करता ठोस पावले उचलण्याची गरज आहे. जेणेकरून अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडणार नाहीत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!