राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण चांगलं तापलं आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या आरोप प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण आणखी तापल आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत एक मोठा गौप्यस्फोट करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करत गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे यांनी दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती आणि माफी मागितली होती, असा खळबळजनक दावा शिंदे यांनी केला. यावर आता उद्धव ठाकरे यांनी देखील खोचक प्रत्युत्तर देत राजकीय वातावरण अधिकच तापवलं आहे.
माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्या या दाव्याला एका वाक्यात प्रत्युत्तर दिलं. त्यांनी म्हटलं, “होय, तेव्हा एकनाथ शिंदे नरेंद्र मोदी यांच्या डस्टबीनमध्ये होते. आम्हाला कळलंच नाही. चला, जय हिंद. ठाकरे यांच्या या उपरोधिक उत्तरामुळे सभागृहात आणि माध्यमांत हशा पिकला.
Eknath Shinde : नागपूर पेट्रोल बॉम्ब हल्ल्याने विधिमंडळात खळबळ
औरंगजेब कबरीवर स्पष्ट भूमिका
उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया याचपर्यंत मर्यादित राहिली नाही. त्यांनी सध्या गाजत असलेल्या औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरही आपली भूमिका ठामपणे मांडली. खुलताबादमधील औरंगजेबाच्या थडग्याभोवती निर्माण झालेल्या वादावर बोलताना ठाकरे म्हणाले, “औरंगजेब महाराष्ट्र जिंकायला आला होत. पण त्याला महाराष्ट्राची माती जिंकता आली नाही. उलट महाराष्ट्राने त्याला मूठमाती दिली. अशा व्यक्तीचं समर्थन महाराष्ट्रात कोणीही शवप्रेमी करणार नाही. परंतु काही लोक केवळ भडकावू भाषणं आणि आंदोलनं करून जनतेचं लक्ष विचलित करत आहेत.
उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवरही टीका केली. “मुख्यमंत्र्यांनी औरंगजेबाची कबर उखडू शकत नाही असं स्पष्ट केलं आहे, कारण केंद्र सरकारने त्या ठिकाणी संरक्षण दिलं आहे. मग डबल इंजिन सरकार काय फक्त वाफा सोडतंय का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
शिंदेंचा विधान परिषदेत आरोप
एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंवर नाव न घेता हल्ला चढवला होता. “यांचे प्रमुख (उद्धव ठाकरे) मोदी साहेबांना जाऊन भेटले, माफी मागितली आणि म्हणाले आम्ही पुन्हा येतो. पण इकडे येऊन पलटी मारली,” असं विधान शिंदे यांनी केलं. यावरून पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध शिंदे संघर्ष तीव्र झाला आहे.
यापूर्वी देखील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संबंध तणावपूर्ण राहिले आहेत. शिवसेनेच्या फुटीनंतर आणि शिंदे गटाने भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर या दोघांमध्ये अनेकदा आरोप-प्रत्यारोपांची मालिका रंगली आहे. नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संबंध कसे होते, यावरून अनेक चर्चा झाल्या. मात्र आता शिंदे यांच्या विधानाने पुन्हा एकदा या मुद्द्यावर राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
एकीकडे महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा, नागपूरमधील दंगलसदृश स्थिती आणि दुसरीकडे ठाकरे-शिंदे यांच्यातील शाब्दिक चकमक यामुळे राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. आगामी लोकसभा निवडणुका जवळ येत असताना या वादाला आणखी उधाण येण्याची शक्यता आहे.
