बुटीबोरीतील 600 मेगावॅटचा दिवाळखोर वीज प्रकल्प अदानी पॉवरने घेतला. या अधिग्रहणामुळे विदर्भात रोजगार आणि औद्योगिक संधी वाढणार आहेत.
विदर्भातील औद्योगिक विकासासाठी महत्वाचं ठरलेलं नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी औद्योगिक क्षेत्र आता नव्या उर्जेच्या लाटेवर स्वार होणार आहे. बुटीबोरी येथील दिवाळखोरीत सापडलेला विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड (व्हीआयपीएल) हा 600 मेगावॅट क्षमतेचा औष्णिक वीज प्रकल्प अदानी पॉवर लिमिटेडने (एपीएल) अधिग्रहित केला आहे.
अधिग्रहणामुळे केवळ वीज निर्मिती क्षेत्राला बळकटी मिळणार नाही, तर स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधींचा पूर उसळणार आहे. वीज निर्मिती संचालनासाठी तांत्रिक कर्मचारी, देखभाल कर्मचाऱ्यांसह विविध व्यवस्थापन आणि सहाय्यक पदांवर भरती होण्याची शक्यता आहे. या भागातील तरुणांना नव्याने रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून आर्थिक स्थैर्याचा प्रवाह गतिमान होईल.
विश्वासार्ह हातभार
अदानी पॉवर ही भारतातील सर्वात मोठी खाजगी औष्णिक वीज उत्पादक कंपनी आहे. या अधिग्रहणामुळे तिची एकूण वीज निर्मिती क्षमता आता 18 हजार 150 मेगावॅटवर पोहोचली आहे. 2029-30 पर्यंत ही क्षमता 30 हजार 670 मेगावॅट करण्याचे ध्येय कंपनीने निश्चित केले आहे. बुटीबोरीतील प्रकल्पात दोन 300 मेगावॅट क्षमतेचे थर्मल युनिट्स आहेत. हा संपूर्ण प्रकल्प 4 हजार कोटी रुपयांमध्ये अदानीने विकत घेतला आहे. कोळशावर आधारित असलेल्या या प्रकल्पातून महाराष्ट्रातील अनेक भागांना वीज पुरवठा केला जाईल. तसेच त्याच्या दैनंदिन व्यवस्थापनासाठी हजारो कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे.
कधी काळी दिवाळखोरीच्या मार्गावर असलेल्या व्हीआयपीएलसाठी हे अधिग्रहण म्हणजे एक प्रकारचं नवजीवन आहे. 18 जून 2025 रोजी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या मुंबई खंडपीठाने अदानी पॉवरच्या पुनरुज्जीवन योजनेला मंजुरी दिली आणि 7 जुलै 2025 रोजी ही योजना प्रत्यक्षात आली. हा बदल केवळ आर्थिक व्यवहारापुरता मर्यादित नाही. या प्रक्रियेमुळे स्थानिक कुशल आणि अकुशल कामगारांना, अभियंत्यांना आणि इतर क्षेत्रातील व्यक्तींना स्थिर रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. नागपूर परिसरातील तंत्रनिकेतन, आयटीआय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठीदेखील प्रशिक्षणाची आणि स्थायिक नोकरीची वाट खुली झाली आहे.
प्रकल्पांतून उर्जेचा विस्तार
अदानी पॉवर सध्या मध्य प्रदेशातील सिंगरौली-महान, छत्तीसगडमधील रायपूर, रायगड आणि कोरबा, राजस्थानमधील कवई आणि उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे 1 हजार 600 मेगावॅट क्षमतेचे सहा ब्राउनफिल्ड अल्ट्रा-सुपरक्रिटिकल प्रकल्प आणि एक ग्रीनफिल्ड प्रकल्प उभारत आहे. याशिवाय, छत्तीसगडमधील कोरबा येथे पूर्वी घेतलेल्या 1 हजार 320 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाचे पुनरुज्जीवनही अदानी पॉवर करत आहे. हे सर्व प्रकल्प एकत्रितपणे 2030 पर्यंत 30 हजार 670 मेगावॅट क्षमतेचा टप्पा गाठतील. अशा प्रकारे भारताच्या ऊर्जा सुरक्षेत मोठा वाटा उचलण्याबरोबरच, हजारो रोजगारनिर्मितीच्या संधी तयार होतील.
अदानी पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. बी. ख्यालिया यांनी स्पष्ट केले आहे की, आम्ही देशाच्या शाश्वत विकासासाठी विश्वासार्ह व परवडणारी वीज देण्यास कटिबद्ध आहोत. ‘सर्वांसाठी वीज’ या दृष्टिकोनाचा पाठिंबा देताना कंपनीने रोजगारनिर्मितीचाही एक महत्त्वाचा घटक मानला आहे.बुटीबोरीसारख्या औद्योगिक क्षेत्रात अशा मोठ्या प्रकल्पांच्या स्थापनेमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेचा दर्जा उंचावतो. शैक्षणिक संस्था, स्थानिक बाजारपेठा, वाहतूक व्यवस्था आणि सेवा क्षेत्र यांना चालना मिळून सामाजिक व आर्थिक समतोल साधला जातो.
Parinay Fuke : खत लिंकिंगचा तोडगा काढण्यासाठी आमदार झाले आक्रमक
अदानी पॉवर लिमिटेड ही अदानी समूहाचा एक अग्रगण्य भाग असून, ती गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये कार्यरत आहे. याशिवाय, गुजरातमध्ये ४० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प देखील कंपनी चालवत आहे. उच्च दर्जाच्या अंमलबजावणी टीम, आधुनिक तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या साहाय्याने अदानी पॉवर भारताच्या ऊर्जा भविष्यात एक महत्त्वाची भूमिका बजावत आहे.