नागपूर विमानन क्षेत्रात ऐतिहासिक झेप घेणार आहे. अदाणी समूहाच्या MRO प्रकल्पामुळे शहर जगातील अग्रगण्य विमान देखभाल केंद्रांच्या नकाशावर चमकणार आहे.
नागपूर आता केवळ मध्य भारताचे हृदय नाही, तर आकाशातील दिग्गजांच्या देखभालीचे केंद्रबिंदू ठरणार आहे. अदाणी डिफेन्स सिस्टिम्स अँड टेक्नॉलॉजीज लिमिटेड (ADSTL) ने आपल्या चॅनेल पार्टनर ‘हवाईअड्डा एनर्जी सॉल्युशन्स लिमिटेड’च्या माध्यमातून ‘प्राइमसरी सर्व्हिसेस LLC’ सोबत हातमिळवणी करून इंडामर प्रायव्हेट लिमिटेडचे (IDPL) 100 टक्के अधिग्रहण पूर्ण केले आहे. याच IDPL कडे आहे नागपूर विमानतळावरील अत्याधुनिक इंजिनिअर टर्मिनल प्रायव्हेट लिमिटेड, ज्यामध्ये एकाचवेळी तब्बल 15 विमानांचे दुरुस्ती, देखभाल आणि पेंटिंग करण्याची ग्रीन-फ्लीट क्षमता आहे.
ही सुविधा 30 टन क्षमतेच्या उच्च-तंत्रज्ञान प्रणालीने सज्ज असून DGCA, EASA आणि अनेक जागतिक विमानन नियामकांकडून मान्यता प्राप्त आहे. नागपूर एअरपोर्टवरील हा हाय-टेक MRO (Maintenance, Repair, Overhaul) हब केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण आशियाई विमानन बाजारासाठी गेमचेंजर ठरणार आहे.
Umesh Kashikar : गांधींच्या लेखणीने कारागृहातून उमटले सौजन्याचे स्वर
आघाडीचा हब
येथे विमानांच्या लाँग-चेक, हेवी मेंटेनन्स, रिपेअर आणि अल्ट्रा-प्रेसिजन पेंटिंगसारख्या सेवा दिल्या जाणार आहेत. हँगर, प्रशासकीय कार्यालये आणि प्राइमसरीसोबतच्या 50-50 भागीदारीत उभारलेल्या अत्याधुनिक सुविधांमुळे नागपूरचे नाव जागतिक एव्हिएशन मॅपवर सुवर्णाक्षरात कोरले जाणार आहे. अदाणी समूहाचे संचालक जीतू अदाणी म्हणाले की, भारतीय विमानन उद्योग झपाट्याने वाढत आहे. पुढील काही वर्षांत 1500 पेक्षा अधिक नवी विमाने ताफ्यात दाखल होणार आहेत. हे अधिग्रहण भारताला जगातील आघाडीचा MRO हब बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
नागपूरची भौगोलिक स्थिती, उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी आणि कमी ऑपरेशनल खर्च हे या प्रकल्पाला सुवर्णसंधी ठरवत आहेत. अदाणी समूहाचा मोठा उद्देश म्हणजे ‘वन-स्टॉप एव्हिएशन सर्व्हिस प्लॅटफॉर्म’ तयार करून, विमान कंपन्यांना सर्व प्रकारच्या दुरुस्ती, देखभाल, अपग्रेडेशन आणि पेंटिंगच्या सेवांचा एकाच छताखाली लाभ देणे. या प्रकल्पामुळे भारताला केवळ ‘वर्ल्ड-क्लास एव्हिएशन सर्व्हिस इकोसिस्टम’ मिळणार नाही, तर जागतिक बाजारपेठेत भारताची पकड मजबूत होणार आहे. नागपूर – हो, हेच आपलं नागपूर होणार आहे या विमानन क्रांतीची नवीन राजधानी.
देशाच्या प्रगतीचा वेग
नागपूरच्या आकाशात आता केवळ विमानं झेपावणार नाहीत, तर इथून संपूर्ण भारतीय विमानन उद्योगाची नवी दिशा निश्चित होणार आहे. अदाणींचा हा MRO प्रकल्प म्हणजे केवळ व्यवसायिक गुंतवणूक नाही, तर हा एक रणनीतिक ‘गेम प्लॅन’ आहे. जो भारताला मेंटेनन्स, रिपेअर आणि ओव्हरहॉलिंगच्या जागतिक बाजारात एक ‘पॉवर प्लेयर’ म्हणून पुढे आणेल. यामुळे स्थानिक रोजगाराला नवी दारे उघडतील, तंत्रज्ञान व कौशल्याचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचेल आणि नागपूरच्या ओळखीला एक नवा ‘एव्हिएशन सिग्नेचर’ मिळेल. विमान उद्योग हा केवळ पंखांचा व्यवसाय नाही, तर तो देशाच्या प्रगतीचा वेग ठरवतो आणि नागपूर आता त्या वेगाच्या कॉकपिटमध्ये बसले आहे.
