
अनेक वर्षांची प्रतीक्षा, अर्धवट उड्डाणपूल आणि नागरिकांचा खवळलेला संताप. या साऱ्यावर शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला जाब विचारत रस्त्यावर जोरदार आंदोलन छेडलं.
एक शहर, एक स्वप्न आणि त्या स्वप्नाचं प्रतीक ठरलेला न्यू तापडिया नगर येथील उड्डाणपूल. गेल्या सात वर्षांपासून अर्धवट अवस्थेत थांबलेला हा पूल आता फक्त वाहतुकीचा नव्हे, तर नागरिकांच्या संयमाचाही कस पाहणारा प्रश्न बनला आहे. सात वर्षांपासून सुरू असलेल्या या पुलाच्या कामाकडे पाहून एकच विचार मनात येतो, ‘विकास’ हे फक्त घोषणांपुरतंच उरलं आहे का?

21 मे रोजी अकोल्यातील न्यू तापडिया नगर परिसरात एक वेगळीच सकाळ उजाडली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या अर्धवट, बेफिकीर आणि दर्जाहीन पुलाच्या कामावर रोष व्यक्त करत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडलं. रेल्वे क्रॉसिंगजवळ झालेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी रस्ता रोको आणि रेल्वे रोको करत प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या बांधकामांवर आमचा रोष आहे, असा कडाडून सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केला.
प्रशासनावर ओढले ताशेरे
शिवसेनेच्या मते, उड्डाणपुलाच्या कामात केवळ विलंबच नाही, तर त्याची संपूर्ण बांधणीच दयनीय आहे. इतकंच नव्हे तर, या अर्धवट कामामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक किलोमीटरचा पूल सात वर्षांपासून अपूर्ण आहे. आणि समृद्धी महामार्ग चार वर्षांत पूर्ण. हाच प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा पुरावा असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे. या कामामागे बांधकाम एजन्सी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Akola Congress : पराभवाच्या कटुतेतून विजय अग्रवालांची बेताल विधानं
आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, कारण आंदोलनाचा स्वर उग्र आणि रोषपूर्ण होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने खबरदारी घेतली. विशेष म्हणजे, शिवसेनेने 28 मे 2022 रोजी नीमवाडी ते हुतात्मा स्मारक आणि मध्यवर्ती कारागृह ते अग्रसेन चौक या दरम्यान उड्डाणपुलांसाठी 203 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती दिली. एवढा प्रचंड निधी खर्च करून जर कामात गुणवत्तेचा अभाव राहिला, तर ते केवळ प्रशासकीय अपयश नव्हे, तर सामान्य जनतेच्या विश्वासाचा अपमान असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
या आंदोलनामुळे अकोल्याच्या विकास प्रश्नाला पुन्हा एकदा चोहीकडे लक्ष वेधलं आहे. लोकांच्या सुरक्षेचा, शासकीय निधीचा आणि सार्वजनिक बांधकामांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता पाहावं लागेल की प्रशासन या प्रकरणात केवळ आश्वासनांपुरतं थांबतं की प्रत्यक्षात काही ठोस पावलं उचलतं. ‘अर्धवट पुलांपेक्षा अर्धवट विकास अधिक धोकादायक’, हे विधान अकोल्याच्या जनतेच्या मनात खोलवर रुजत चाललं आहे, असे शिवसेनेने म्हटले.