महाराष्ट्र

Eknath Shinde : बाळासाहेब ठाकरे यांच्या AI आवाजावरून रणसंग्राम 

Shiv Sena : महाराष्ट्रात डिजिटल राजकीय रण 

Post View : 25

Author

AI तंत्रज्ञानाची जादू आता थेट राजकारणात शिरली आहे. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा आवाज वापरून शिंदेंवर टीका केली, आणि एकनाथ शिंदेंनी थेट व्हिडिओ पुराव्यांनिशी प्रत्युत्तर दिलं. 

नाशिकमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) च्या ‘निर्धार मेळाव्या’त AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा भन्नाट वापर करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक अद्वितीय राजकीय खेळी केली. AI च्या साहाय्याने दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज पुन्हा जिवंत केला गेला. त्या आवाजातून थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकेचे बाण सोडण्यात आले. हे ऐकून सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली. हे खरंच बाळासाहेब बोलले का? पण एकनाथ शिंदेंनी यावर प्रतिक्रिया देताना थेट सांगितलं, AI वापरून मतं बदलता येत नाहीत, आणि बाळासाहेबांचे विचारही नकली आवाजात बसत नाहीत.

शिंदेंनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं नाही, तर लाज सोडली आहे, असा घणाघाती टोला त्यांनी लगावला. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे जुने व्हिडिओज मोबाईलवर दाखवत स्पष्ट केलं की, बाळासाहेब म्हणाले होते, काँग्रेससोबत मी कधीच जाणार नाही. अशी वेळ आली तर मी माझं दुकान बंद करेन. आता काँग्रेससोबत सरकार चालवणाऱ्या उद्धव ठाकरेंवर शिंदेंनी अगदी बोट ठेवलं. तुम्हीच दुकान चालवताय, पण हे दुकान आता कोण घेत नाही.

जनता तुमच्यापासून दूर

AI तंत्रज्ञानाची जादू वापर करून बाळासाहेबांचा आवाज तयार करणं ही कल्पना जरी हटके असली तरी शिंदेंना ती फारशी आवडलेली नाही. हे तुमचं AI ड्रामा आहे. पण त्यामुळे बाळासाहेबांचं मत बदलत नाही. उलट, जनतेचं मत तुमच्यापासून दूर जातंय, असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांनी राज ठाकरे, छगन भुजबळ यांचं उदाहरण देत सांगितलं की, जे खरे होते ते तुमच्यापासून दूर गेले. आता जनता देखील ओळखते. ही नकली टोळी आहे. शिंदेंनी अजून एक जोरदार विधान करत ठाकरेंना टोला लगावला. तुम्ही शिवसेनेवर घाण टाकली, आम्ही ती स्वच्छ केली आणि शिवसेना पुन्हा उभी केली.

Yavtmal : भावना गवळींचे कार्यक्षेत्र पुन्हा ‘प्रायव्हेट लिमिटेड’

राजकीय आघाडीवर हल्लाबोल करत असतानाच शिंदे दुसऱ्या बाजूला ग्रामविकासातही लक्ष घालतायत. सध्या ते त्यांच्या गाव दरेमध्ये आहेत. इथे त्यांनी थेट सफरचंद, आंबा, चिकू, फणस यांसारख्या विविध फळझाडांची लागवड सुरू केली आहे. ते म्हणाले, हे फक्त झाडं नाहीत, हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचं फळबाग गाठण्याचं स्वप्न आहे!” युवकांना उद्योगधंद्याच्या संधी मिळाव्यात यासाठी ‘नवीन महाबळेश्वर प्रकल्प’ राबवण्यात येणार आहे. दरे गावाचं रूपांतर पर्यटनस्थळात होणार आहे.

AI तंत्रज्ञानाचा वापर, बाळासाहेबांचा आवाज, शिवसेनेचं खरेपण, सफरचंदाच्या झाडांपासून थेट उद्योगधंद्यापर्यंत. महाराष्ट्राचं राजकारण आता चांगलंच मनोरंजन देतंय. पुढचं पाऊल कोण उचलणार? आणखी कोणाचा ‘आवाज’ येणार? जनता बघतेय आणि मनोरंजन होतेय.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!