आपल्या रोखठोक आणि कठोर बोलण्यामुळं अकोल्यात एक नाव चर्चेत असतं. आमदार रणधीर सावरकर हे ते नाव. आता पुन्हा एकदा त्यांचं नाव चर्चेत आलं आहे.
अकोला पश्चिम विधानसभा निवडणूक हरीश अलीमचंदानी यांनी बंडखोरी केली. त्यानंतर त्यांना भाजपमधून निष्कासित करण्यात आलं. तत्पूर्वीच त्यांनी पक्षातून राजीनामा दिला होता. आता अलीमचंदानी यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. त्यांच्यासोबतच सिंधी समाजाबद्दलही अकोल्याच्या राजकीय वर्तुळात बोलण्यात येत आहे. सिंधी समाजाला भाजपकडून तुच्छ वागणूक देण्यात आल्याचं हे प्रकरण आहे. सध्या या एकाच विषयाची अकोल्याच्या राजकारणात चर्चा आहे. अकोला पूर्वचे भाजप आमदार हरीश अलीमचंदानी यांच्या नावापासून ही चर्चा सुरू झाली आहे.
बंडखोरी केल्यामुळं आमदार रणधीर सावरकर यांचा हरीश अलीमचंदानी यांना विरोध आहे. त्यांच्यावर सावरकरांचा प्रचंड राग आहे, अशी चर्चा आहे. हाच राग सावरकर यांनी अलीमचंदानी यांच्यावर व्यक्त केला. सावरकर अलीमचंदानी यांना अत्यंत अपमानास्पद पद्धतीनं बोलले. इतकंच काय तर सिंधी समाज पाकिस्तानातून आला आहे. सिंधी समाज भारतीय नागरिक नाहीच. सिंधी ‘रेफ्युजी’ आहेत. त्यामुळं त्यांनी पाकिस्तानात जावं, असं आमदार सावरकर बोलले. सध्या अकोल्यात जिकडे तिकडे याचीच चर्चा आहे.
नेमकी भेट कुठे?
आमदार रणधीर सावरकर आणि हरीश अलीमचंदानी एका कार्यक्रमात एकत्र आले. त्यावेळी अलीमचंदानी यांनी स्वत: आमदार सावरकर यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सावरकर यांनी त्यांना एका बाजूला नेत अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली. तुम्हालाच काय तर अलीमचंदानी यांच्या सात पिढ्यांनाही भाजपमध्ये येऊ देणार नाही, असं सावरकरांनी थेट सांगितलं. सध्या अकोल्यात हाच विषय चर्चिला जात आहे. त्यामुळं ऐन जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकीपूर्वी अकोल्यातील राजकारण तापविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
‘द लोकहित लाइव्ह’ने या घटनेचं पूर्ण सत्य 360 डिग्री अँगलने तपासलं. त्यावेळी नेमकं काय घडलं, हे समोर आलं. एका विवाह सोहळ्यात आमदार रणधीर सावरकर आणि हरीश अलीमचंदानी हे भेटले. ही वस्तुस्थिती आहे. अलीमचंदानी हे सावरकर यांच्या जवळ स्वत:हून गेले, हे देखील सत्य आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना ‘शेकहॅन्ड’ केला. मात्र त्यानंतर घडलेलं संपूर्ण कथानक पूर्णपणे काल्पनिक आहे. कोणत्याही सत्य घटनेवर ते आधारित नाही. खास म्हणजे अलीमचंदानी यांनी सावरकर यांना केव्हा भेटता भाऊ, अशी विचारणा केली. त्यावेळी सावरकर यांनी नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक झाल्यावर सावकाश भेटू असे उत्तर दिले.
मनातून दुश्मनी?
हरीश अलीमचंदानी यांनी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केली. त्यामुळं अकोला पश्चिममध्ये भाजपचा पराभव झाला. मात्र हा घटनाक्रम राजकीय होता. त्यामुळं आमदार सावरकर आणि अलीमचंदानी यांच्यात ‘पर्सनल दुश्मनी’ होईल, असं अजिबातच नाही. या राजकीय वादाचा काहींनी गैरफायदा घेण्यास सुरुवात केली आहे. सावरकर, अलीमचंदानी यांच्या भेटीतील ‘ध’चा ‘मा’ करण्यात आला. एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा हा प्रयत्न होता.
यात कोणतेही तथ्य नसल्याचं सिद्ध झालं आहे. स्वत: हरीश अलीमचंदानी आणि आमदार रणधीर सावरकर यांनी नेमकं काय घडलं हे देखील स्पष्ट केलं. या भेटीच्या वेळी आसपास जे लोक होते, त्यांनीही नेमकं काय घडलं यावर सूर्य प्रकाशाइतका प्रकाश टाकला. भाजपमधील काही लोक व अलीमचंदानी यांच्या शत्रुंनीच हा अपप्रचार सुरू केल्याचं पुढं आलं. त्यातून सावरकर यांनी अलीमचंदानी यांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीची चर्चा निराधार ठरली. कोणताही लोकप्रतिनिधी कधीही अशा पद्धतीनं वागत नसतो. सावरकर आणि अलीमचंदानी हे देखील त्यातील नाही. परंतु महापालिका निवडणुकीपूर्वी आता अकोल्यात अपप्रचाराचं पीक चांगलंच वाढीस आल्याचं यावरून दिसतं.
