राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आणि व्हीव्हीआयपींचं गाव असलेल्या नागपुरात पोलिसांना जे जमलं नाही, ते अकोला पोलिसांनी करून दाखवलं आहे.
नेहमीच सर्वाधिक ‘व्हीव्हीआयपी मुव्हमेंट’ असलेल्या नागपुरात पोलिस जवळपास ‘हायअलर्ट’वर असतात. मात्र जे प्रचंड मनुष्यबळ असलेल्या नागपूर पोलिसांना जमलं नाही ते अकोला पोलिसांनी करून दाखविलं आहे. एकाच दिवसात अकोला पोलिसांनी शहरात धावणाऱ्या 90 दुचाकी जप्त केल्या आहेत. यापैकी एकाही दुचाकीला नंबर प्लेट नव्हती. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ‘होमटाऊन’च्या वाहतुकीला शीस्त लावणाऱ्या अर्चित चांडक यांनी हे करून दाखवलं आहे. अर्चित चांडक हे अकोला येथे पोलिस अधीक्षक पदावर नियुक्त होण्यापूर्वी नागपूर शहराचे वाहतूक उपायुक्त होते. त्यांनी ‘चमकोगिरी’ न करता खरोखर नागपूरच्या वाहतुकीला शीस्त लावली.
अकोला पोलिसांनी शहरात एकाच वेळी ही व्यापक मोहित राबविल्यानं दुचाकी चालकांचे धाबे दणाणले आहे. पोलिसांन याप्रकरणी 35 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यातून 25 प्रकरणांमध्ये 12 हजार 500 रुपयांची रोख दंड वसुली करण्यात आली आहे. अकोला हे जातीय दृष्टीने अत्यंत संवेदनशील शहर आहे. स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट (SIMI) आणि दीनदार अंजुमन या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचे एकेकाळी अकोला मुख्यालय होते. देशभरातील अनेक हिंदू-मुस्लिम दंगलींची प्लानिंग अकोल्यातच झाली होती. त्यामुळे ‘द लोकहित लाइव्ह’ने अर्चित चांडक यांची अकोला येथे भेट घेत विना नंबर प्लेटचा मुद्दा त्यांच्या लक्षात आणून दिला होता. त्यांनीही या संवादाचा सन्मान राखला.
Nagpur Police : सिंगल साहेब कळलं का? एकच डीसीपी अंगार, बाकी भंगार
सिंगल यांनाही विनंतीच!!!
नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी स्वत: पुढाकार घेत अर्चित चांडक यांना वाहतूक विभागाच्या पोलिस उपायुक्त (DCP) पदाची जबाबदारी सोपविली होती. ही जबाबदारी चांडक यांनी सार्थक करून दाखविली. चांडक यांची बदली होताच पुन्हा नागपुरात वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. वसुली सुरू झाली आहे. नवीन असे काहीच झालेले नाही. त्यामुळे नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनाही बाबत पुढाकार घेण्याची विनंती जनहिताच्या दृष्टीने आहे.
मोटार वाहन कायद्यानुसार नंबर प्लेट नसलेले वाहन चालविणे गुन्हा आहे. पोलिसांच्या चलान (E-Challan) पासून वाचण्यासाठी किंवा एखाद्या गुन्हा करण्यापूर्वी संबंधित व्यक्ती वाहनांवरील नंबर प्लेट काढून ठेवतात. मुलींची छेडखानी, चेनस्नॅचिंग, वाहतूक नियमांची पायमल्ली अशा घटनांमध्ये नंबर प्लेटच्या आधारावर वाहनाचा आणि आरोपीचा मागोवा घेणे सोयीचे होते. नागपूर शहरात ‘द लोकहित लाइव्ह’ने सलग चार महिने वेगवेगळ्या विभागातील विना नंबरप्लेटच्या वाहनांची संख्या नोंदवली. नागपूर शहरात सद्य:स्थितीत दररोज सरासरी 265 पेक्षा जास्त वाहनं विना नंबर प्लेट फिरत आहेत. या प्रत्येक वाहनांची रितसर नोंद परिसर निहाय ‘द लोकहित लाइव्ह’ने करून ठेवली आहे.

—————————————————————————————————————————————————————–
संघ कार्यालयाजवळ हुटर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय रेशीमबाग येथे आहे. या भागात 16 नोव्हेंबर 2025 रोजी दोन चारचाकी वाहने एका पाठोपाठ जात होती. ही वाहने कोणत्याही आमदार, खासदार किंवा व्हीव्हीआयपी व्यक्तींची नव्हती. कॉलेजचे तरूण ही दोन्ही वाहने चालवत होते. या वाहनांवर पोलिसांच्या फ्लॅशर प्रमाणे एलईडी लाइट होते. याशिवाय दोन्ही वाहनांना हुटर (Siren) देखील लावण्यात आले होते. ‘द लोकहित लाइव्ह’ने एकाच वेळी नागपूर आणि अकोला पोलिसांना घटत असलेल्या या प्रकाराबद्दल अवगत केले. नागपूर पोलिसांनी या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केले. मात्र अकोल्यात अर्चित चांडक यांनी हा विषय अत्यंत गंभीरतेने घेतला.
‘लोकहित’ आग्रही का?
नंबर प्लेट नसलेल्या वाहनांबाबत ‘द लोकहित लाइव्ह’ला इतकी काय पडली असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण त्यामागे संभावित गुन्ह्यांना वेळीच आळा घालणे हाच सर्वांत मोठा हेतू आहे. नागपूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. अलीकडेच नागपुरातील महाल भागात जातीय दंगल झाली होती. आरएसएस मुख्यालय असल्यानं नागपूरचा काही भाग नेहमीच दहशतवादी कृत्याच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील ठरतो. अशात नागपूर सारख्या शहरात नंबर प्लेटशिवाय वाहनं फिरत असतील तर हा भविष्यात गंभीर धोक्याला आमंत्रण देऊ शकतो.

विना नंबरप्लेटच्या वाहनांसोबतच नागपूर शहरात एकच नंबरप्लेट असलेली अनेक वाहने फिरतानाही आढळली आहेत. हायसिक्युरिटी नंबर प्लेट लाताना वाहन चालक जुन्या नंबर प्लेट फिटिंग सेंटरवरच टाकून देतात. याच जुन्या नंबरप्लेटचा वापर काही तरूणांकडून करण्यात येत असल्याचे आढळले आहे. ‘
द लोकहित लाइव्ह’ने गेल्या तीन महिन्यात मोमीनपुरा, मानेवाडा, हुडकेश्वर, सीताबर्डी, गणेशपेठ, महाल, चितारओळी या भागात अशी 87 वाहने पाहिली ज्या दोन्ही दुचाकींची नंबर प्लेट एकच होती. याबाबत यापूर्वीही ‘द लोकहित लाइव्ह’ने नागपूरचे सहपोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांना अवगत केले आहे.नागपुरातील दुर्लक्षित असलेला हाच प्रकार विदर्भातील अमरावती, वर्धा शहरातही आढळला आहे. मात्र या प्रकाराकडे पोलिसांचे होणारे दुर्लक्ष भविष्यात भोवणारे ठरू शकते. गुन्हा घडल्यानंतर पोलिसांना आरोपीचा शोध घेताना बरेचदा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी गुन्हेगार अशा ‘आयडिया’चा वापर करीत असतात. ‘प्रिव्हेन्शन पोलिसिंग’चा वापर झाल्यास नागपूरसह विदर्भात अनेक ठिकाणी संभाव्य गुन्हे वेळीच टाळता येऊ शकतील.
