विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर काँग्रेसने राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष पद नेमके कोणाकडे जाणार, यावर सर्वांचे लक्ष केंद्रित झालं आहे.
राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली आणि निकालाने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. त्यानंतर काँग्रेसने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदावरून हटविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नाना पटोले लवकरच प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होणार आहेत. काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत आहेत. तर या पदासाठी तरुण चेहऱ्याला संधी मिळणार का ? असा प्रश्नही काँग्रेसमध्ये उपस्थित झाला आहे.
2021 मध्ये नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदी त्यांची निवड झाली होती. पटोले यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कारकिर्दीला आता चार वर्षे झाली आहेत. नाना पटोले यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठा यश प्राप्त झालं. परंतु महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला. त्यामुळे नाना पटोले यांना हटविण्याची मागणी पक्षातून करण्यात येत आहे.
प्रदेशाध्यक्षपदासाठी कॉंग्रेस पक्षश्रेष्ठी तरुण नेत्यांची चाचपणी करीत असल्याची चर्चा सुरू आहे. पक्षात पुन्हा उत्साह निर्माण करणार, अशा नेतृत्वाच्या शोधात काँग्रेस असल्याचे म्हटले जात आहे. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे आता प्रदेशाध्यक्षपदासाठी कुणाचे भाग्य खुलणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नेत्यांचा पुढाकार नाही
विदर्भातून प्रदेशाध्यक्ष पदासाठी यशोमती ठाकूर यांचही नाव चर्चेत आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विदर्भात जास्त यश प्राप्त झालं आहे. विधिमंडळ गटनेतेपदासाठी नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांचं नाव चर्चेत आहे. पटोले किंवा वडेट्टीवार यांच्यापैकी कोणालाही विधिमंडळ गटनेते बनविले तर प्रदेशाध्यक्षपद पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाड्याकडे जाण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षातील तरुण नेते स्वतःहून प्रदेशाध्यक्षपद सांभाळण्यास इच्छुक नाहीत, असेही म्हटले जात आहे. त्यामुळे पक्षातील बडे नेते किंवा तरूण नेते यांच्यापैकी कोणी स्वतःहून हे पद घेण्यास उत्सुक नसल्याचं चित्र दिसून येत आहे. पण पक्षाने जबाबदारी दिली तर घ्यावी लागणार, असेही पक्षातील नेते म्हणत आहेत.
प्रदेशाध्यक्षपदासाठी माझं नाव नाही
प्रदेशाध्यक्षपदासाठी होणाऱ्या नावांच्या चर्चेबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वक्तव्य केल आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आपण नसल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. या महिन्यात नवा प्रदेशाध्यक्षाची निवड होणार की नाही हे देखील मला माहित नाही, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.
