उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरच्या कुर्डू गावात अवैध मुरुम उत्खननाच्या कारवाईदरम्यान महिला पोलीस अधिकाऱ्यांवर फोनवर दमदाटी केली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या नवा डाव रंगतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे ढोल वाजत असताना, मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याने वातावरण ढवळून निघाले आहे. या सगळ्या गदारोळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खडतर शैलीने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांची थेट आणि आक्रमक बोलण्याची शैली नेहमीच चर्चेत असते. पण यावेळी तीच शैली त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरताना दिसतेय. सोलापूरच्या माढा तालुक्यातील कुर्डू गावात घडलेल्या एका घटनेने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
अजित पवार यांनी एका महिला आयपीएस अधिकाऱ्याशी फोनवर केलेल्या संवादाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्याने राजकीय वादळाला जन्म दिला.सोलापूरच्या कुर्डू गावात अवैध मुरुम उत्खननाची माहिती मिळाल्याने तहसीलदार आणि तलाठी कारवाईसाठी पोहोचले. त्यांच्यासोबत करमाळा उपविभागाच्या पोलिस उपअधीक्षक अंजली कृष्णा आणि त्यांचे पथकही तिथे दाखल झाले. कारवाई सुरू असतानाच गावकऱ्यांनी थेट अजित पवारांना फोन लावला. अजित पवारांनी अंजली कृष्णा यांच्याशी बोलताना कथितपणे दमदाटी केल्याचा व्हिडीओ आता सर्वत्र पसरला आहे.
सोलापूर कारवाई प्रकरण
व्हिडीओने अजित पवारांना टीकेच्या कठेघरात उभे केले असताना, त्यांच्या बचावासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आक्रमक आमदार अमोल मिटकरी मैदानात उतरले आहेत. त्यांनी आपल्या सडेतोड शैलीत विरोधकांना सुनावले आणि अजित पवारांची पाठराखण केली आहे.अमोल मिटकरी, जे नेहमीच त्यांच्या तिखट वक्तव्यांसाठी ओळखले जातात, यावेळीही मागे हटले नाहीत. त्यांनी अजित पवारांवर टीका करणाऱ्या विरोधकांना चांगलेच खडसावले. इतकेच नाही, तर त्यांनी थेट अंजली कृष्णा यांच्या केंद्रीय लोकसेवा आयोगातील नियुक्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
पूजा खेडकर प्रकरणासारखाच अंजली कृष्णा यांच्या निवड प्रक्रियेत घोळ असल्याची शंका आहे, असे मिटकरी यांनी अकोला येथे बोलताना सांगितले. त्यांनी यासंदर्भात राज्य सरकार आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे तक्रार करण्याचा इरादा जाहीर केला आहे. मिटकरींच्या मते, अजित पवार यांचे नाव न ओळखणारी आणि मग्रूर वृत्ती दाखवणारी अधिकारी संशयास्पद आहे. त्यांनी अंजली कृष्णा यांच्यावर महाराष्ट्राचा अपमान केल्याचा ठपकाही ठेवला. दरम्यान, या प्रकरणाने सोलापूरच्या कुर्डू गावातही खळबळ उडाली आहे. व्हायरल व्हिडीओमुळे गावातील 15 ते 20 जणांवर गुन्हे दाखल झाले असून, शेतकरी आणि स्थानिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
Nagpur : खोट्या नंबर प्लेट्स, हातात धारदार शस्त्र, नेमकं चाललंय तरी काय
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, अजित पवार यांनी काहीही चुकीचे केले नाही. विरोधक केवळ या प्रकरणाचा गवगवा करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा त्यांनी केला. या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वळण आले आहे. अजित पवारांच्या आक्रमक शैलीने एकीकडे त्यांना समर्थक मिळवून दिले, तर दुसरीकडे टीकेचा भडिमारही वाढला आहे.
