राज्यात गेल्या काही दिवसांपासून आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक गंभीर घटना अमरावती जिल्ह्यातही उघडकीस आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या आरोग्य विभागातून एकापेक्षा एक खळबळजनक घटना समोर येत आहेत. रुग्णालयांमधील गोंधळ, रुग्णांना होणारा त्रास आणि सरकारी नाकर्तेपण आता लपून राहिलेले नाही. याच पार्श्वभूमीवर, अमरावतीच्या विभागीय संदर्भसेवा रुग्णालयाच्या (सुपरस्पेशालिटी) दयनीय अवस्थेविरोधात काँग्रेसने शनिवारी (20 सप्टेंबर रोजी), रस्त्यावर उतरत जोरदार आंदोलन केले. रुग्णालय परिसर ’महायुती सरकार हाय हाय’ आणि ’रुग्णांचा जीव वाचवा’ अशा घोषणांनी दणाणून गेला. डॉक्टरांचे थकित मानधन, बंद पडलेल्या वैद्यकीय सेवा आणि रुग्णांचे हाल यावर काँग्रेसने महायुती सरकारच्या भ्रष्ट आणि निष्क्रिय कारभारावर हल्लाबोल केला.
माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर मिलिंद चिमोटे, विलास इंगोले आणि किशोर बोरकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन रंगले. कार्यकर्त्यांनी हातात फलक आणि सरकारविरोधी घोषणा घेऊन रुग्णालय प्रशासन आणि सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला. गरीब रुग्णांचा जीव वाचवण्यापेक्षा सत्ताधारी जाहिरातींच्या मायाजालात रममाण आहेत, असा घणाघात काँग्रेस नेत्यांनी केला. कधीकाळी अमरावतीच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाने गरीब आणि गरजूंना आधार दिला होता. मूत्रपिंड प्रत्यारोपण, हृदयरोग उपचार, प्लास्टिक सर्जरी आणि लहान मुलांवरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यामुळे हे रुग्णालय खऱ्या अर्थाने ‘जीवदान’ देणारे ठरले होते. पण आता? महायुती सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे रुग्णालय ‘सुपर’ न राहता ‘सुपर फ्लॉप’ झाले असल्याचा आरोप काँग्रेसने केला.
Harshwardhan Sapkal : मोदींच्या राजीनाम्याच्या चर्चेत फडणवीसांचा उदय?
महायुतीचे निष्क्रीय धोरण
गेल्या दीड वर्षांपासून डॉक्टरांचे मानधन थकले आहे. त्यामुळे गेल्या 25 दिवसांपासून सुपरस्पेशालिटी डॉक्टर्स आणि कर्मचारी संपावर आहेत. याचा फटका थेट रुग्णांना बसला आहे. डायलिसिस, मूत्रपिंड प्रत्यारोपण, हृदयरोग उपचार आणि लहान मुलांच्या शस्त्रक्रिया पूर्णपणे ठप्प. रुग्ण प्रतीक्षायादीत अडकले आहेत. तर काहींनी उपचाराअभावी जीव गमावल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. एकदा रुग्णालयात येणारा रुग्ण आता येथे यायला घाबरतो, असे एका रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितले. कर्करोगासारख्या गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांच्या तपासण्या आणि शस्त्रक्रिया थांबल्या आहेत. सत्ताधारी कोट्यवधी रुपये जाहिरातींवर उधळतात, मग रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे थकित पगार द्यायला पैसे का नाहीत? असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.
स्थानिक लोकप्रतिनिधींवरही रुग्णांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला. आंदोलनादरम्यान रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकही पुढे आले. त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. डॉ. सुनील देशमुख यांनी सरकारवर जोरदार टीका करताना म्हटले, महायुती सरकार निगरगट्ट आणि असंवेदनशील आहे. सत्ताधारी फक्त कमिशनच्या टक्केवारीत मश्गूल आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांना कवडीमोल वाटतात. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या गंभीर समस्येकडे पाठ फिरवली आहे. सरकारने तातडीने डॉक्टरांचे थकित मानधन द्यावे, अन्यथा जनता रस्त्यावर उतरेल. या आंदोलनाने अमरावतीच्या रस्त्यांवर खळबळ उडाली आहे. काँग्रेसने स्पष्ट केले की, जोपर्यंत रुग्णालय पुन्हा सुरळीत होत नाही आणि रुग्णांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत त्यांचा लढा सुरू राहील.