अकोला भाजपचा वटवृक्ष करण्यासाठी ज्यांनी अख्खं आयुष्य वेचलं ते अकोला पश्चिमचे दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा ऊर्फ लालाजी यांच्या मुलाच्या हाती भाजपनं बंद घड्याळीचे सेल बांधले आहे.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचा किल्ला ज्यांनी प्रचंड ताकदीने कायम ठेवला होता, त्या लालाजींचे डोळे मिटताच भाजपने त्यांच्या कार्यकर्त्यांची हेळसांड सुरू केली आहे. इतकेच नव्हे तर लालाजींचे सुपुत्र अनुप यांना पदवीधर मतदारसंघाच्या एका सेलचे अध्यक्ष करण्याचे उपकार पक्षाने केले आहेत. अनुप यांना कोणते अधिकार असतील? ते कोणते निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकतील? याचे उत्तर देण्याचे धाडस मात्र कोणत्याही भाजपच्या नेत्याने दाखविले नाही. उलट भाजपचे प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांच्या पाठीमागे लपत नेत्यांनी या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले.
प्रदेश भाजपातील नेत्यांचे खिसे गरम केले की, अकोल्यात काहीही करता येते, याची चर्चा सध्या अकोल्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये अनेक दिवसांपासून सुरू आहे. लालाजी यांनी अकोला पश्चिममध्ये भाजपचा झेंडा फडकवत ठेवला होता. एक एक कार्यकर्ता जपला होता. परंतु भाजपला त्यांच्या निधनानंतर अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात विजय मिळविता आला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखे फायरब्रॅन्ड नेते अकोल्यात येऊन गेले. पण तरीही भाजपचा लाजीरवाणा पराभव झाला. हा पराभव का झाला याचे उत्तर आता सगळ्यांना अनुप शर्मा यांच्या नियुक्तीनंतर मिळाले आहे.
हेकेखोरी कायम
भाजपमध्ये सध्या काही नेत्यांची हेकेखोरी कायम आहे. प्रदेश पातळीवरील नेत्यांना आम्ही खिशात घेऊन फिरतो. लिहिणाऱ्यांपुढे पैशांची हाडं फेकली की कुणालाही विकत घेता येते. आपल्या विरोधात कुठेही कोणी एक अक्षरही लिहू शकत नाही, अशा ‘ओव्हरकॉन्फिडन्स’ मध्ये सध्या काही नेते वावरत आहे. त्यामुळेच आजही अकोल्यातील अनेक निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांचा अपमान करण्याचा प्रकार कायम आहे. लाजीरवाणा पराभव झालेल्या नेत्यांची पोरं आपल्यापेक्षा वयाने दुप्पट ज्येष्ठ कार्यकर्त्यांना कमरेखालच्या भाषेत शहाणपण शिकवत आहे. हे सारं ‘पार्टी विथ डिफ्रन्स’ असलेले भाजपचे वरिष्ठ नेते पहात आहेत आणि ऐकून न ऐकल्यासारखे करत आहे.
या सगळ्यांचा परिपाक म्हणून आपले पूर्ण आयुष्य भाजपला देणाऱ्या लालाजींच्या सुपुत्राला आतापर्यंत सोशल मीडियाची जबाबदारी देण्यात आली होती. याच लालाजींच्या चेल्याचपट्यांमुळे आमचा पराभव झाला असे खापर भाजपच्या काही नेत्यांनी श्रीराम नवमी शोभायात्रेदरम्यान उघडपणे फोडले होते. आता त्याच लालाजींच्या मुलाला एका सेलचे अध्यक्ष करण्यात आले आहे. त्या मतदारसंघाचे, ज्याची निवडणूक व्हायला अद्याप बराच वेळ आहे. त्यामुळं लालाजींच्या परिवाराचं भाजपमध्ये काहीच योगदान नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांनी भाजपसाठी जो खस्ता खाल्ला त्याचेच हे फळ का की, अनुप शर्मा यांना असा सेल देण्यात आला, जो चार्जच नाही. अकोल्यासाठी दिवंगत नेते भाऊसाहेब ऊर्फ पांडुरंग फुंडकर यांनी प्रचंड परिश्रम केले. त्याचे चिरंजीव आकाश फुंडकर यांना राज्यात कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. आकाश फुंडकर यांनी मात्र चुकीच्या ‘गुरू’च्या नादी न लागता आपले काम प्रामाणिकपणे करावे, अशी सर्वांची अपेक्षा आहे. लालाजी यांच्या प्रमाणे माजी खासदार संजय धोत्रे यांनीही अकोल्यात भाजपचं रोपटं वटवृक्ष केलं. त्यांचे चिरंजीव अनुप धोत्रे यांना पक्षाने खासदार केले आहे. अनुप धोत्रे यांनी लबाड लांडग्यांपासून वाचत अकोल्याचा विकास करावा. पक्षातील गटबाजीच्या भानगडीत पडू नये, अशी अपेक्षा निष्ठावान कार्यकर्त्यांची आहे.
फुंडकर आणि धोत्रे यांनी पक्षासाठी जो खस्ता खाल्ला त्याच्या पुण्याईचे फळ अनुक्रमे त्यांच्या मुलांना मिळाले आहे. मात्र लालाजी यांचे असे कोणते पाप आडवे आले की त्यांच्या परिवाराला, कार्यकर्त्यांना ‘साइड ट्रॅक’ करण्यात आले, असा प्रश्न त्यांच्या नियुक्तीनंतर अनेकांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात भाजपमधीलच अनेकांनी ‘द लोकहित लाइव्ह’शी संपर्क साधत नाराजी व्यक्त केली. अकोल्यातील प्रा. सुभाष गादिया यांनी तर अनुप यांचे नाव पदवीधर मतदारसंघाचे उमदेवार म्हणून जाहीर व्हायला हवे होते, अशी जाहीर मागणीच भाजपच्या ग्रुपवर केली. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जात काढणारे व त्यांच्याबद्दलही कमरेखालच्या भाषेत बोलणारे हे होऊ देतील का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
Sajid Khan Pathan : जात-धर्म विसरून आमदार म्हणाले ‘मिच्छामी दुखडम्’
कणाच उरला नाही
ज्यांना जगभरातील स्वयंसेवक परमपूज्य नावाने संबोधतात आणि ज्या मुख्यमंत्र्याने एका रात्रीतून महाविकास आघाडीचा गेम पलटविला त्यांच्याबद्दल अपशब्द काढणाऱ्यांना भाजपने सर्वस्व सोपविले आहे. ‘लक्ष्मी दर्शन’ झाले की आता पक्षात काहीही करून घेता येते, अशी टीका कार्यकर्त्यांकडून होत आहे. महात्मा गांधी यांच्यापुढं अनेक जण आजही झुकतात. त्याच गांधीजींचा फोटो असलेले कागदं दाखविली जात असल्यामुळेच पक्षात काहींची हुकुमशाही व मुजोरी कायम असल्याची टीका आता अनुप शर्मा यांच्यासोबत झालेल्या अन्यायानंतर अधिक तीव्र झाली आहे.
लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक होणार आहे. अकोला पश्चिममध्ये ‘एडीचोटी का जोर’ लाऊनही भाजपची जी नाचक्की झाली, त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तरी भाजपने वेळीच काहींना ब्रेक लावणे गरजेचे आहे. अन्यथा यंदाच्या निवडणुकीत महापालिका भाजपच्या हातून निसटेल व उरली सुरलीही राहणार नाही, असे भाजपमधील अनेक कार्यकर्ते आता उघडपणे बोलू लागले आहेत.
