महाराष्ट्रातील इलेक्ट्रिक वाहनांना अटल सेतू, मुंबई-पुणे आणि समृद्धी एक्सप्रेसवेवर टोलमुक्ती देण्यात आली आहे. ज्यामुळे पर्यावरणपूरक वाहतुकीस चालना मिळेल.
महाराष्ट्रातील वाहन चालकांसाठी वाहतूक विभागाकडून रोज नवनवीन अटी आणि नियमांचा प्रवाह सुरू आहे. या प्रवाहात आता एक आनंदाची बातमी आली आहे. भारतातील सर्वात लांब सागरी पूल, अटल सेतू (ज्याला पूर्वी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणून ओळखले जायचे), आता इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोल-मुक्त झाला आहे. वाहतूक विभागाकडून सातत्याने नवनवीन नियम आणि अटी समोर येत असताना, ही बातमी हरित वाहतुकीला चालना देणारी आहे. शुक्रवारी (22 ऑगस्ट रोजी) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, राज्याच्या नगरविकास विभागाने गुरुवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ही सवलत इलेक्ट्रिक चारचाकी वाहने आणि इलेक्ट्रिक बसेसना लागू होईल. मग ती राज्य परिवहनाची असो वा खाजगी ऑपरेटरद्वारे चालवली जाणारी. या निर्णयामुळे मुंबईच्या रस्त्यांवर हरित क्रांतीला गती मिळणार आहे.
21.8 किलोमीटर लांबीचा हा भव्य सागरी पूल आता पर्यावरणपूरक वाहनांसाठी अधिक आकर्षक ठरणार आहे. यापूर्वी 31 जानेवारीला जारी केलेल्या अधिसूचनेत सर्व प्रकारच्या वाहनांवर टोल आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता महाराष्ट्र मोटार वाहन कर कायदा, 1958 तरतुदींनुसार यात सुधारणा करण्यात आली आहे. हा बदल पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक ठोस पाऊल आहे. ज्यामुळे इंधनावरील अवलंबित्व कमी होईल आणि कार्बन उत्सर्जनावर आळा बसेल. महाराष्ट्राच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत (EV धोरण) इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये अटल सेतूसह प्रमुख महामार्गांवरील टोल मधून सूट हा महत्त्वाचा निर्णय आहे. खाजगी इलेक्ट्रिक कार, प्रवासी चारचाकी वाहने, राज्य परिवहनाच्या इलेक्ट्रिक बस आणि शहरी सार्वजनिक वाहतुकीतील इलेक्ट्रिक वाहने या सवलतीसाठी पात्र ठरतील.
Marbat Festival : नागपूरात ट्रम्पपासून पहलगामपर्यंत, बडग्यांचा सामाजिक प्रहार
पर्यावरणपूरक वाहतूक प्रोत्साहन
इलेक्ट्रिक मालवाहतूक वाहनांना मात्र या योजनेचा लाभ मिळणार नाही. लवकरच ही सवलत मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि समृद्धी एक्सप्रेसवेवरही लागू करण्याचे संकेत मिळाले आहेत. ज्यामुळे राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आणखी वाढेल. मुंबईत सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा ताफा झपाट्याने वाढत आहे. शहरात 18 हजार 400 हलकी चारचाकी वाहने, 2 हजार 500 हलकी प्रवासी वाहने, 1 हजार 200 जड प्रवासी वाहने आणि 300 मध्यम प्रवासी वाहने नोंदणीकृत आहेत. एकूण 22 हजार 400 इलेक्ट्रिक वाहने मुंबईच्या रस्त्यांवर धावत आहेत. अटल सेतूवरून दररोज सुमारे 60 हजार वाहने प्रवास करतात, त्यापैकी ३४ हजार ते 40 हजार वाहने केवळ या पुलाचा वापर करतात.
22 हजार वाहने समृद्धी एक्सप्रेसवेवर आणि हजारो वाहने मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर धावतात. या टोल सवलतीमुळे इलेक्ट्रिक वाहनचालकांना आर्थिक दिलासा मिळेल आणि पर्यावरणपूरक वाहनांचा वापर वाढेल. हा निर्णय केवळ टोल सवलतीपुरता मर्यादित नाही, तर तो महाराष्ट्राच्या हरित भविष्याचा पाया मजबूत करणारा आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवून राज्य सरकार हवेचे प्रदूषण कमी करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलत आहे. यामुळे मुंबईसारख्या महानगरात, जिथे वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. तिथे स्वच्छ आणि शाश्वत वाहतूक व्यवस्था निर्माण होण्यास मदत होईल. ही सवलत इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला प्रोत्साहन देईल आणि सामान्य नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता वाढवेल. अटल सेतू सारख्या भव्य प्रकल्पाला हरित वाहतुकीचा आधार मिळाल्याने, महाराष्ट्र आता पर्यावरण संरक्षणात देशाचे नेतृत्व करत आहे.
Ravikant Tupkar : पावसाळी अधिवेशनात तमाशा, करोडो रुपयांचा चुराडा
