महाराष्ट्रात राहुल गांधींच्या आकडेवारी वरून मत चोरीचा वाद सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना सिरीयल लबाड ठरवून जोरदार टीका केली.
महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या मत चोरीचा वाद चांगलाच गाजतोय. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर मत चोरीचा गंभीर आरोप करत पुराव्यांचा डोस सादर केला आणि संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. या आरोपांनी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. एकीकडे निवडणूक आयोगाने राहुल यांच्या आरोपांना खोडून काढत आपली बाजू मांडली, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला. या सगळ्या नाट्यात काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही तिखट शब्दांत फडणवीसांना प्रत्युत्तर देत वादाला नवी धार चढवली आहे.
राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत घोटाळा झाल्याचा दावा करत निवडणूक आयोगावर हल्ला चढवला. त्यांनी कर्नाटकातील महादेवपुरा मतदारसंघात एक लाख बोगस मतदार असल्याचा आरोप केला आणि महाराष्ट्रात तब्बल एक कोटी मतदार अचानक कुठून आले, असा सवाल उपस्थित केला. यावर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत सांगितले की, सर्व पक्षांना समान वागणूक दिली जाते. कोणतेही आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे सादर करावेत. पण या सगळ्या गदारोळात लोकनीती-सीएसडीएसचे सह-संचालक संजय कुमार यांनी त्यांच्या एका पोस्टमुळे राजकीय आग आणखी भडकवली.
डेटा चुकीचा कबुली
संजय कुमार यांनी महाराष्ट्र निवडणुकीत मतदारसंख्येत वाढ झाल्याचा दावा केला, पण नंतर चुकीचा डेटा पोस्ट केल्याची कबुली देत माफी मागितली आणि पोस्ट डिलीट केली. या सगळ्या घडामोडींवर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी चांगलाच राग काढला. त्यांनी देवेंद्र फडणवीसांना खडेबोल सुनावत म्हटले, तुम्ही निवडणूक आयोगाचे प्रवक्ते बनण्याचा प्रयत्न का करताय? आयोगाने मतदार यादी तपासल्यानंतरच राहुलजींनी पत्रकार परिषद घेतली. संजय कुमार यांच्या पोस्टवर आम्ही काही बोललो नाही. मग तुम्ही इतके का बिथरताय?
निवडणूक आयोग आता भाजप निवडणूक आयोग आघाडी बनलाय की काय? की तुम्ही त्यांचे महिला मोर्चा, युवा मोर्चा यासारखे आयोग मोर्चा चालवताय? अतुल लोंढे फडणवीसांवर निशाणा साधताना म्हणाले, ‘चोर चोर मौसेरे भाई’ असं काहीसं नातं तुमचं आणि आयोगाचे आहे, हे आता सिद्ध झालंय. देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना सिरियल लबाड’ म्हणत जोरदार टीका केली होती. राहुल गांधी खोटं बोलून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत. महाराष्ट्रात मत चोरी झालीच नाही. त्यांचा मेंदू चोरीला गेलाय की काय? असा खोचक टोला फडणवीसांनी लगावला होता. त्यांनी काँग्रेसच्या आरोपांना बिनबुडाचे ठरवत निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेचा दावा केला.
