महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून सातत्याने पक्षांतर्गत बदल होताना दिसत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने देखील आता रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय पटावर सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची तयारी जोरात सुरू आहे. पक्षांतर्गत रणनीती बदल, कार्यकर्त्यांचे पक्षबदल आणि आरक्षणाच्या सोडतीनंतर उडालेल्या भुवयांमधून एक वेगळीच गतिशीलता दिसतेय. अशा या राजकीय वादळात वर्धा जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने एक ठोस पाऊल टाकले आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या स्पष्ट निर्देशानुसार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री अनिल देशमुख आणि फ्रंटल सेलचे प्रमुख आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत अतुल वांदिले यांची वर्धा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नियुक्ती केवळ एक बदल नव्हे, तर जिल्ह्यातील पक्षाला नवसंजन देणारी क्रांतीच आहे. अतुल वांदिले हे नाव वर्ध्यात शेतकऱ्यांच्या लढ्याशी जोडलेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते शेतकऱ्यांसाठी अहोरात्र झटत आहेत. समाजकार्य, संघटन कौशल्य आणि राजकीय दूरदृष्टी यामुळे ते जिल्ह्यात ओळखले जातात. विविध सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. जनतेच्या समस्या थेट मांडण्यात ते अग्रेसर आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील युवकांना राजकारणात पदार्पण करण्यासाठी प्रेरित करणे हे त्यांचे मोठे योगदान आहे.
Election Strategy : या एका नेत्यामुळे मनसेला मविआत स्थान नाही
बदलते समीकरण
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या नियुक्तीचा गौरव करत म्हटले, अतुल वांदिले यांची निवड ही संघटनेला बळकटी देणारा ठोस निर्णय आहे. त्यांच्या कार्यकौशल्यामुळे पक्ष अधिक मजबूत होईल. या नियुक्तीमुळे वर्धा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अधिक संघटित होईल आणि जनतेच्या मुद्द्यांवर आक्रमक लढा देईल, असा विश्वास अतुल वांदिले यांनी व्यक्त केला. ही जबाबदारी पक्षाला नव्या उंचीवर नेली जाईल, असे ते म्हणाले. कार्यकर्त्यांमध्ये या बदलाने आनंदाची लहर उसळली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून, नगरपंचायतींमधून, नगरपरिषदांमधून आणि ग्रामीण भागातून अतुल वांदिले यांच्या नियुक्तीचे जोरदार स्वागत होत आहे.
सोहळ्यात माजी आमदार सुनिल भुसारा, माजी वर्धा जिल्हाध्यक्ष सुनिल राउत आणि भंडारा जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे उपस्थित होते. वर्धेच्या राजकीय समीकरणात हा बदल पक्षाला स्थानिक निवडणुकींत मजबूत स्थिती देईल, असे बोलले जात आहे. शरद पवारांच्या दूरदृष्टीने घेतलेल्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवे जोश निर्माण झाला असून, येणाऱ्या काळात वर्धा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनेल, अशी अपेक्षा आहे. अतुल वांदिले यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, युवक आणि सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी पक्ष नव्या दिशेने वाटचाल करेल. ही नियुक्ती केवळ एक पदवी नव्हे, तर जिल्ह्यातील राजकीय परिवर्तनाची सुरुवात आहे, ज्यामुळे राष्ट्रवादी पुन्हा एकदा जनतेच्या मनात घर करेल.
