महाराष्ट्रातील राजकारण सध्या अनेक मुद्द्यांवरून तापलेलं आहे. विशेषतः औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून राज्यात मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ भैयाजी जोशी यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर भेटीबाबतही त्यांनी महत्त्वाचे मत मांडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालय असलेल्या नागपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी डॉ. हेडगेवार यांना अभिवादन करत राष्ट्रीय विचारांना बळ दिले. मोदींच्या या दौऱ्यावर भाष्य करताना भैयाजी जोशी म्हणाले, मोदीजी संघापासून दूर आहेत, असे सांगणारे चुकीचे बोलत आहेत. संघ आणि मोदीजी यांच्यात कोणत्याही प्रकारची दरी नाही. संघ कायमच त्यांच्या पाठीशी आहे.
भैयाजी जोशी पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक प्रकल्पांना ऊर्जा दिली आहे. त्यांच्या हस्तक्षेपामुळे अनेक प्रकल्प मार्गी लागले आहेत. नरेंद्र मोदी हे सेवाभावी वृत्तीने काम करणारे नेते आहेत. कोरोना काळातही त्यांनी समाजसेवेसाठी पुढाकार घेतला होता. नागपूरमध्ये माधव नेत्रालय प्रकल्पाचा शिलान्यास त्यांच्या हस्ते झाला. यामुळे हा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जाईल.
Devendra Fadnavis : राज म्हणाले, मराठी राखा; फडणवीस म्हणाले, कायदा पाळा
मोदींचे उत्तराधिकारी
भविष्यात नरेंद्र मोदी यांचे उत्तराधिकारी कोण असतील, याविषयी विचारले असता भैयाजी जोशी म्हणाले, संघाच्या परंपरेनुसार योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. सध्या उत्तराधिकारी ठरवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मोदींचे उत्तराधिकारी महाराष्ट्रातून असतील का, या प्रश्नावर त्यांनी माझ्याकडे याबाबत कोणतीही माहिती नाही, असे उत्तर दिले.
औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे. यावर प्रतिक्रिया देताना भैयाजी जोशी म्हणाले, “हा अनावश्यक विषय आहे. औरंगजेब मरण पावला, म्हणून त्याची कबर येथे आहे. ज्यांना श्रद्धा असेल, ते तिथे जातील. मात्र, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचारधर्माचे पालन करतो. त्यांनी अफजलखानाचीही कबर बांधली होती. भारताची हीच सर्वसमावेशकता आणि उदारता आहे.”
नागपूर दौऱ्याचे महत्त्व
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्याने संघ आणि भाजप यांच्यातील संबंध अधिक दृढ झाल्याचे दिसत आहे. डॉ. हेडगेवार यांच्या जयंतीनिमित्त मोदींनी संघ मुख्यालयाला भेट दिली. यामुळे स्वयंसेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमी येथेही भेट दिली. माधव नेत्रालय प्रकल्पाच्या शिलान्यासामुळे नागपूरमध्ये वैद्यकीय सुविधा आणखी सुधारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यामुळे संघाच्या विचारधारेला अधिक बळ मिळाले असून, आगामी काळात हे संबंध अधिक दृढ होतील, असे चित्र आहे.
