भंडारा काँग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी राष्ट्रीय महामार्गावरील भ्रष्टाचार उघडकीस आणून सरकारला कोंडीत पकडले आहे.
पूर्व विदर्भ म्हटले की, भंडारा आणि गोंदिया हे दोन जिल्हे प्रत्येकाच्या मनात घर करतात. या भागाच्या विकासासाठी सातत्याने लढणारे, सत्ताधाऱ्यांना सवाल विचारणारे आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे काँग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी पुन्हा एकदा आपली आक्रमक भूमिका दाखवली आहे. भंडारा-वरठी-तुमसर या रस्त्यावरील भ्रष्टाचाराचा नवा अध्याय त्यांनी उघडकीस आणला आहे. फावडा हातात घेऊन रस्त्यावरील खड्ड्यांना दुरुस्त करण्याचा त्यांचा हा अनोखा प्रयत्न चर्चेचा विषय ठरला आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांनी प्रवाशांचे जीव धोक्यात आणले असून, अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही.
प्रशासन मात्र गाढ झोपेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रस्त्यांवरील खड्डे हे केवळ माती आणि दगडांचे नाहीत, तर भ्रष्टाचाराचेही प्रतीक बनले आहेत, असा थेट आरोप पडोळे यांनी केला आहे. भंडारा ते वरठी मार्गे तुमसर हा रस्ता म्हणजे प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रोजच अपघात होत आहेत. पण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहेत. पडोळे यांनी या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
Devendra Fadnavis : वर्षा बंगल्यावरून मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला दिला निरोप
जनतेसाठी पुढाकार
अखेर, स्वतःच्या हाताने खड्डे बुजवण्याचा निर्णय घेत त्यांनी जनतेच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घेतला. त्यांच्या या कृतीने भंडारा-गोंदिया मतदारसंघातील जनतेच्या भावना पुन्हा एकदा तीव्र झाल्या आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांनी प्रवाशांचे हाल बेहाल केले आहेत. भंडारा-वरठी-तुमसर मार्गावरील खड्डे इतके मोठे आहेत की, ते पाहून वाहनचालकांचा थरकाप उडतो. या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जणू मृत्यूच्या दाढेतून जाण्यासारखे आहे. पडोळे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले. त्यांच्या या कृतीला भंडारा शहर आणि ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांनीही साथ दिली.
खासदारांना स्वतः फावडा हातात घ्यावा लागतो, तर मग शासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण काय करत आहे, असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. पडोळे यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. जनतेने मला सेवा करण्याची संधी दिली आहे, पण सरकार मात्र रस्त्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करत आहे. अनेकांचे जीव गेले, अपघात झाले, तरीही अधिकाऱ्यांना याची पर्वा नाही, असे त्यांनी ठणकावले. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला खड्डे बुजवण्याचे आणि रस्त्याचं काम तातडीने सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. जनतेच्या जीवाशी खेळू नका, असा इशारा देत त्यांनी सरकारला लवकरात लवकर कारवाई करण्याचे आव्हान दिले आहे.
