सध्या सर्वांचे लक्ष बिहार विधानसभा निवडणुकीवर केंद्रित झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या या निवडणुकीसाठी एनडीए, इंडिया आघाडी आणि इतर पक्षांनीदेखील सक्रिय हालचाली सुरू केल्या आहेत.
बिहारच्या राजकीय आखाड्यात यंदा एक नवे खेळाडू उतरले आहेत. ते म्हणजे प्रशांत किशोर यांचा जन सुराज पक्ष. पहिल्यांदाच बिहार विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या या पक्षाने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करत राजकीय वातावरणात उत्साह निर्माण केला आहे. एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यातील तुंबळ युद्धात आता जन सुराज पक्षानेही आपली ताकद दाखवण्याचा निर्धार केला आहे. पंतप्रधान मोदींच्या एका कॉलवर संयुक्त राष्ट्रसंघाची नोकरी सोडणारे प्रशांत किशोर, ज्यांना पीके म्हणून ओळखले जाते, आता बिहारच्या जनतेला ‘सुराज’चे स्वप्न दाखवत आहेत.
दुसऱ्या यादीत जन सुराजने 64 उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. तर पहिल्या यादीत 51 उमेदवारांची घोषणा झाली होती. आतापर्यंत एकूण 116 उमेदवार मैदानात उतरवत पक्षाने आपली रणनीती स्पष्ट केली आहे. विशेष म्हणजे, या यादीत सामाजिक समीकरणांचा बारकाईने विचार करण्यात आला आहे. 65 उमेदवारांपैकी 18 अनुसूचित जाती, 1 अनुसूचित जमाती, तर 14 अति मागासवर्गीय (यात 10 हिंदू आणि 4 मुस्लिम) आणि 46 खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश आहे. जन सुराजने उमेदवार निवडताना सामाजिक समीकरणांचा खुबीने वापर केला आहे.
प्रभावी नेतृत्व
दीघा येथून कृष्ण मोहन, पतनाहा येथून नवल किशोर चौधरी, बाजपट्टी येथून अजम हुसैन, तर सीतामढी येथून जियाउद्दीन खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय, हरलाखी येथून रत्नेश्वर ठाकूर, झंझारपूर येथून केशव भंडारी, त्रिवेणीगंज येथून प्रदीप राम आणि कटिहार येथून राजी शरीक यांच्यासारखे उमेदवार मैदानात आहेत. ही यादी केवळ नावांची नाही, तर बिहारच्या प्रत्येक स्तरातील समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न आहे. ठाकुरगंज येथून मोहम्मद इकरामुल हक, कस्बा येथून इंतेखाब आलम, तर मधेपुरा येथून शशि कुमार यादव यांसारखे नावे यादीत सामील आहेत. निवडणुकीत जन सुराज पक्षाने नवख्या पक्षाला साजेशी धडाडी दाखवली आहे.
विशेषतः बिहारच्या राजकारणात एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यातील अंतर्गत कलह सर्वश्रुत आहे. दोन्ही आघाड्यांमधील अंतर्गत संघर्ष मतदारांमध्ये संभ्रम आहे. जन सुराज पक्षाने उमेदवार निवडीतून दाखवलेली सामाजिक समावेशकता आणि रणनीती यंदाच्या निवडणुकीत किती प्रभावी ठरेल, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. बिहारच्या या निवडणुकीत चुरस वाढली आहे. एकीकडे एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्या आघाडीतील मतभेद बाजूला ठेवून लढण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे जन सुराज पक्षाने आपल्या ताज्या यादीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. प्रशांत किशोर यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष बिहारच्या जनतेला ‘सुराज’चे स्वप्न दाखवत आहे. आता मतदार कोणाला साथ देतील, हे येणारा काळच ठरवेल.
Corporation Elections : राजकीय रंगमंचावर महिला सुपरस्टार्सचा जलवा
