देशाच्या राजकीय वर्तुळात सध्या खळबळ उडाली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी रणांगण सज्ज असून एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यात जोरदार मुकाबला होणार आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय रंगमंचावर नाट्यमय घडामोडी घडत आहेत. एकीकडे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे बिहारमध्ये विधानसभेच्या रणसंग्रामाची आगामी लढाई तितकीच चुरशीची होणार आहे. मात्र, बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मध्ये जागावाटपाचा तिढा कायम आहे. यामुळे आघाडीच्या अंतर्गत गटबाजी आणि नाराजी उफाळून येत आहे. विशेषतः हिंदुस्तानी आवाम मोर्चा (एचएएम) चे नेते जीतन राम मांझी यांच्या नाराजीने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.एनडीएच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. यामुळे बिहारच्या राजकीय आखाड्यात तणाव निर्माण झाला आहे.
मांझी यांनी नुकतीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. परंतु जागावाटपावरून त्यांची नाराजी कायम आहे. मांझींच्या या अस्वस्थतेचे पडसाद एनडीएच्या एकतेला धक्का देऊ शकतात. जर जागावाटपाचा तिढा सुटला नाही, तर मांझी स्वतःच्या पक्षाकडून 15 ते 20 जागांवर उमेदवार उभे करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे एनडीएच्या रणनीतीला मोठा फटका बसू शकतो. शनिवारी ( ऑक्टोबर ) नवी दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जेपी नड्डा, बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल आणि आघाडीतील इतर नेते उपस्थित होते. या बैठकीत जागावाटपाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न झाला. परंतु मांझींची नाराजी कमी होण्याची चिन्हे दिसली नाहीत.
Congress : अरेच्चा! प्रदेशाध्यक्षांनी थेट कार्यकर्त्याला खांद्यावरच उचलले
चिराग पासवानचे स्वातंत्र्य
जनता दल युनायटेड (जेडीयू) 101-102 जागा लढवण्याच्या तयारीत आहे. तर भाजप त्यांच्यापेक्षा एक जागा कमी लढवेल. मात्र, एचएएम आणि लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) यांच्यासोबतचा तिढा कायम आहे. बिहार भाजपचे अध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी एनडीएत सर्व काही आलबेल आहे असा दावा केला असला, तरी वास्तव वेगळे सांगते. ते म्हणाले, जागावाटपाचा करार रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत जाहीर होईल. या बैठकीत बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते. चौधरी यांनी दावा केला की, सर्व मित्रपक्षांनी आपले विचार मांडले असून कोणतीही नाराजी नाही. परंतु, एचएएमच्या राष्ट्रीय सरचिटणीस राजेश पांडे यांनी वेगळेच संकेत दिले. आम्ही आमचे पर्याय खुले ठेवले आहेत.
राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, असे त्यांनी ठणकावून सांगितले.दुसरीकडे, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चे प्रमुख चिराग पासवान यांना त्यांच्या पक्षाच्या संसदीय मंडळाने सर्व निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. यामुळे जागावाटपाच्या चर्चेत चिराग यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मांझींच्या संभाव्य बंडखोरीमुळे एनडीएला मोठा धक्का बसू शकतो. जर मांझी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास, बिहारच्या राजकीय समीकरणांवर त्याचा मोठा परिणाम होईल. बिहारच्या या राजकीय नाट्याचा शेवट कसा होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. एनडीएला आपली एकजूट टिकवता येईल की मांझींचा बंडखोर पवित्रा आघाडीला भारी पडेल? रविवारपर्यंत जागावाटपाचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. परंतु तोपर्यंत बिहारच्या राजकीय रंगमंचावर नाट्यमय घडामोडी घडत राहतील, यात शंका नाही.
