महाराष्ट्र

Local Body Elections : कमळ फुलविण्यासाठी पूर्णपणे सज्ज 

Chandrashekhar Bawankule : निवडणुकीचा सूर्य म्हणजे विकास

Post View : 21

Author

राज्यातील राजकारण पुन्हा उष्ण होत असून निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेची तयारी सुरू केल्यानंतर राजकीय पक्षांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

राज्याच्या राजकीय रणभूमीवर पुन्हा एकदा उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेसाठी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. ज्यामुळे येत्या ऑक्टोबरपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणूक पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप पूर्णपणे सज्ज असल्याचा दावा करत राजकीय हालचालींना आणखी वेग दिला आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, भाजपचा संघटन पर्व पूर्ण झाला आहे. लवकरच नवीन प्रदेशाध्यक्षाचे नाव जाहीर होणार आहे. आज निवडणूक असो की उद्या, आम्ही पूर्ण ताकदीने तयार आहोत, असे बावनकुळे म्हणाले.

निवडणुकीची वेळ निश्चित 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत बावनकुळे म्हणाले, ऑक्टोबरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे आवश्यक आहे. राज्य सरकारने निवडणूक आयोगाला त्यासाठी आवश्यक सर्व संसाधने उपलब्ध करून दिली आहेत. नागरिकांमध्ये आणि संभाव्य उमेदवारांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. त्यामुळे निवडणूक ही आता टाळता येणारी गोष्ट नाही. ते पुढे म्हणाले, राज्यात जवळपास 13 हजार पदांसाठी निवडणूक होणार असून यात जिल्हा परिषद, नगर परिषद, नगर पंचायत आणि महानगरपालिका यांचा समावेश आहे. या निवडणुकांमधून महाराष्ट्राला नव्या नेतृत्वाची मोठी फळी मिळणार आहे.

Sunita Jamgade : नागपूरची महिला हरवली श्रद्धेत अन् सापडली शत्रूच्या सीमेत

सुविधा आणि विकास

महसूल मंत्र्यांनी निवडणूक हा विकासाचा पाया असल्याचे ठामपणे नमूद केले. ते म्हणाले, निवडणूक झाल्याशिवाय लोकांपर्यंत शाश्वत विकास पोहोचू शकत नाही. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था एकत्रित काम करतील, तरच समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सुविधा आणि विकास पोहचू शकतो. महसूल खात्याच्या नव्या उपक्रमाची माहिती देताना बावनकुळे म्हणाले की, आम्ही ‘चलता सेतु केंद्र’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बस स्वरूपातील सेतु केंद्रे तयार करून ती थेट गावांमध्ये पाठवली जातील. नागरिकांना जात, उत्पन्न, जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र यासारख्या सर्व आवश्यक सेवा त्यांच्या दारातच मिळणार आहेत.

मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती देताना त्यांनी स्पष्ट केले की, राज्य सरकारने सर्व सेवा ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मालमत्तेसंबंधीचे वाद, विविध प्रशासकीय अडचणी थांबतील आणि नागरिकांना कलेक्टर कार्यालयापर्यंत जाण्याची गरज भासणार नाही. घरबसल्या त्यांना सर्व शासकीय सेवा उपलब्ध होतील. भाजपने संघटनात्मक स्तरावर आपली घडी बसवली आहे. आता नव्या नेतृत्वाची घोषणा आणि कार्यकर्त्यांची रणनिती हे पक्षाच्या पुढील वाटचालीचे निर्णायक टप्पे असणार आहेत. बावनकुळे यांचा आत्मविश्वास आणि निवडणूक तोंडावर असल्याचा स्पष्ट संकेत यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!