भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी पूर्व नागपूरमध्ये महापालिका निवडणुकीतही आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. सलग विधानसभा विजयांसोबतच महापालिकेतही भाजपने आपली भक्कम ताकद दाखवून दिली आहे.
नागपूरच्या पूर्व विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. सलग 4 वेळा विधानसभा निवडणुकीत वाढत्या मताधिक्याने विजय मिळवणारे आमदार कृष्णा खोपडे यांनी आपली लोकप्रियता केवळ विधानसभेतच नव्हे, तर महापालिकेतही ठामपणे दाखवून दिली आहे. पूर्व नागपूरमधून 2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपने एकूण 29 पैकी तब्बल 24 जागांवर विजय मिळवत काँग्रेससह इतर पक्षांना मोठा धक्का दिला होता. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत विरोधकांना अधिक परिश्रम करावे लागणार आहेत.
पूर्व विधानसभा मतदारसंघात एकूण 10 प्रभागांचा समावेश आहे. त्यापैकी प्रभाग क्रमांक 21, 23, 24, 25, 26 आणि 27 हे शंभर टक्के पूर्व नागपूरमधील आहेत. येथे भाजपने जवळपास सर्वच ठिकाणी विजय मिळवला आहे. प्रभाग 21 मध्ये 2 भाजप, 1 काँग्रेस आणि 1 अपक्ष नगरसेवक निवडून आले. प्रभाग 23 मध्ये 3 भाजप आणि 1 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नगरसेवक होते. प्रभाग 24 व 26 मध्ये सर्वच 4 नगरसेवक भाजपचे निवडून आले. प्रभाग 25 व 27 मध्ये भाजपचे अनुक्रमे 3 नगरसेवक, तर काँग्रेसचे 1 नगरसेवक निवडून आले. प्रभाग 28 मधून आलेला नगरसेवक देखील भाजपचाच होता. या सर्व आकडेवारीतून स्पष्ट होते की पूर्व नागपूर हे भाजपचे भक्कम गढ ठरले आहे.
ShivSena : गणरायाच्या मंडपातून मतदारांच्या मनापर्यंत पोहोचण्याचा मास्टरप्लॅन
राजकीय रचना
आमदार कृष्णा खोपडे यांनी विधानसभा निवडणुकीत दरवेळी आपले मताधिक्य लक्षणीयरीत्या वाढवले आहे. 2019 मध्ये त्यांनी 1 लाख 03 हजार 992 मते मिळवली, तर काँग्रेसचे प्रतिस्पर्धी पुरुषोत्तम हजारे यांना 79 हजार 975 मते मिळाली. 2024 मध्ये त्यांच्या मताधिक्यात आणखी वाढ होऊन ते 1 लाख 63 हजार 390 पर्यंत पोहोचले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे दुनेश्वर पेठे यांना 48 हजार 102 मते, अपक्ष पुरुषोत्तम हजारे यांना 11 हजार 359 मते, तर अपक्ष आभा पांडे यांना 9 हजार 402 मते मिळाली. या आकडेवारीतून स्पष्ट होते की पूर्व नागपूर मतदारसंघात भाजपचा प्रभाव प्रचंड असून, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांना येथे पाय रोवण्यासाठी मोठे आव्हान आहे.
2017 महापालिका निवडणुकीत पूर्व नागपूरमधील एकूण 29 जागांपैकी भाजपने 24, काँग्रेसने 3 आणि इतरांनी 2 जागा जिंकल्या होत्या. या प्रचंड बहुमतामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला असून, पुढील निवडणुकीतही तेच समीकरण कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
