
भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर थेट निशाणा साधला आहे. मराठीप्रेमाचं नाटक करून मतांसाठी युती केल्याचा त्यांचा आरोप आहे.
राज्याच्या राजकारणात सध्या भलतेच वारे वाहू लागले आहेत. हिंदी- मराठी भाषावाद पुन्हा पेटलेला असतानाच आता ठाकरे बंधूंची अचानक एकत्र येऊन झालेली युती सर्वांनाच धक्का देणारी ठरत आहे. 5 जुलै 2025 रोजी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एका वेगळ्याच पानाची नोंद झाली आहे. तब्बल दोन दशकांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने हा दिवस ऐतिहासिक ठरला. ही युती महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली असल्यामुळे राजकीय पटलावर त्याचे पडसाद उमटले आहेत. विशेष म्हणजे याच दिवशी दोन्ही गटांनी एकत्र बैठक घेतल्याने विरोधी पक्षांसह सत्ताधारी गटांमध्येही खळबळ माजली आहे. दरम्यान, हिंदी सक्तीचा निर्णय आणि त्यावरील विरोध हे प्रकरणही अद्याप शमलेले नाही. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी हिंदी सक्तीचा निर्णय घेतला होता. या निर्णयावरून राज्यभर वाद निर्माण झाला होता. ठाकरे बंधूंनी या निर्णयाला विरोध दर्शवला होता. त्यामुळे युती झाल्यानंतर दोघांचाही विरोध केवळ राजकीय हेतूने असल्याचे टीकेचे सूर उमटत आहेत.
अकोल्याचे भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी या युतीवर आक्रमक प्रतिक्रिया देताना स्पष्टपणे म्हटले आहे की, ठाकरे बंधूंची युती ही मराठीसाठी नसून महापालिकेतील मतांसाठी केलेली राजकीय खेळी आहे. सावरकर म्हणाले की, मराठीला जेव्हा शास्त्रीय भाषेचा दर्जा मिळाला होता, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्याची उघडपणे थट्टा केली होती. इतकेच नाही तर, मराठीला मुख्य भाषा म्हणून वगळण्यात आले तेव्हा त्यावर सही करणारेही उद्धव ठाकरेच होते. आता हेच ठाकरे मराठीसाठी गळा काढत आहेत. ही गोष्ट जनतेच्या डोळ्यांदेखत घडत असून, याला निर्लज्जतेची परिसीमा म्हणावी लागेल. रणधीर सावरकर यांच्या या टीकेमुळे ठाकरे बंधूंनी केलेल्या युतीमागचे हेतू पुन्हा चर्चेत आले आहेत. मराठीसाठी एकत्र येण्याचा दावा करणाऱ्या या दोन नेत्यांची पूर्व भूमिका पाहता, त्यांच्या या युतीला जनतेचा फारसा विश्वास लाभेल असे दिसत नाही.

Raj – Uddhav Alliance : एकत्र राहण्याचं वचन, ठाकरेंनी दाबलं रीस्टार्ट बटन
भाषणामुळे खळबळ
सावरकर यांनी ठाकरे बंधूंच्या गतकाळातील भूमिकांवरही बोट ठेवले. मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण करणारे हे नेते प्रत्यक्षात मराठीला न्याय देण्यात अपयशी ठरले आहेत. सरकारमध्ये असताना मराठी विरोधी निर्णय घेतल्याचे ठोस पुरावे असूनही आज तेच नेते मराठीप्रेमाचे ढोंग करत आहेत. त्यांच्या या मराठीप्रेमामागे मतांच्या राजकारणाशिवाय काहीच नाही, अशी सावरकरांची ठाम भूमिका आहे. राजकीय स्वार्थासाठी वेळोवेळी भूमिका बदलणाऱ्या नेत्यांना सावरकर यांनी लोकशाहीचा अपमान करणारे ठरवले आहे. मतांसाठी कोणत्याही थराला जाण्याची ही वृत्ती धोकादायक असून, जनतेने डोळसपणे विचार करून यावर मतप्रदर्शन करावे, असा अप्रत्यक्ष संदेशही त्यांनी दिला.
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून आधीच राज्यातील वातावरण चिघळलेले आहे. पावसाळी अधिवेशनात या विषयावरून मोठा गदारोळ पाहायला मिळाला होता. त्यातच ठाकरे बंधूंची अचानक एकजूट आणि त्यावर भाजप नेत्यांनी केलेली टीका यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे आहेत. सध्या मराठीच्या मुद्द्यावरून राजकीय खेळी सुरू असली तरी यामागचा खरा हेतू जनतेच्या लक्षात येत आहे. राज्याच्या राजकारणात जी एकवटलेली अस्वस्थता आहे, त्यात रणधीर सावरकर यांच्या वक्तव्याने आणखी तेल ओतले आहे. ठाकरे बंधूंची युती केवळ निवडणुकीपुरती आहे की त्यामागे खरोखरच कोणता मोठा विचार आहे, हे वेळच ठरवेल. मात्र सावरकरांनी उपस्थित केलेले मुद्दे हे निश्चितच विचारप्रवृत्त करणारे आहेत.
Sulbha Khodke : रोग चढतोय मुळांना, संत्र्यासाठी हाक मंत्र्यांना