सामाजिक बांधिलकी जपत भाजप आमदार संदीप जोशी यांचा वाढदिवस यंदा अनोख्या पद्धतीने साजरा झाला. कामगार वस्तीतल्या शेकडो मुलांना सायकलींची भेट देत पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
समाजकारण म्हणजे केवळ भाषणे, घोषणाबाजी किंवा राजकीय संघर्ष नव्हे. तर ते म्हणजे लोकांच्या जीवनात थेट बदल घडवून आणणे. हाच संदेश देत आमदार संदीप जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त कामगार वस्तीतला एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. लहानग्या विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नातील नवी कोरी सायकल मिळाली आणि परिसर आनंदाच्या लहरींनी भारावून गेला. नगरसेवकापासून विधान परिषदेपर्यंतचा प्रवास करणारे आमदार संदीप जोशी हे नागपूरच्या राजकारणातील विश्वासार्ह चेहरा मानले जातात.
मेहनत, निष्ठा आणि लोकसेवेच्या भावनेने त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. यंदा त्यांच्या वाढदिवशी कार्यकर्त्यांनी ‘लोकसेवा दिवस’ म्हणून सामाजिक उपक्रमांची मालिका उभारली. आरोग्य, शिक्षण व जनकल्याण या क्षेत्रांवर आधारित कार्यक्रमांनी नागपूर शहराला सामाजिक बांधिलकीची नवी जाणीव करून दिली. या उपक्रमाचा गाभा साधा होता, पण परिणाम अफाट. काही दिवसांपूर्वी भाजयुमो कार्यकर्त्यांनी नागपुरातील कामगार नगर व गायत्री नगर परिसरात सर्वेक्षण केले होते. प्रश्न होता शिक्षणासाठी सर्वात मोठी गरज कोणती? उत्तरांनी सर्वांना थक्क केले. बहुतेक पालकांनी सांगितले की, मुलांकडे सायकल असती तर शाळेत जाण्या-येण्यात वेळ वाचला असता, अभ्यासाला अधिक वेळ मिळाला असता.
Vice Presidential Election : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः उतरतील का रणभूमीवर?
वाढदिवस सेवेसाठी अर्पण
पालकांच्या उत्तरातून उपक्रमाची दिशा निश्चित झाली. सायकली खरेदीसाठी मोठा खर्च अपेक्षित होता. मात्र भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष पारेन्द्र पटले यांनी पुढाकार घेत समाजातील दानशूर व्यक्तींना कल्पना मांडली. उपक्रमाची महत्ता समजताच दानशूर हात पुढे सरसावले आणि 300 हून अधिक सायकली मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी तयार झाल्या. त्रिमूर्ती नगर येथील भगवती सभागृहात सायकल वाटपाचा सोहळा रंगला. आमदार संदीप जोशी यांच्या हस्ते मुलांना सायकली देण्यात आल्या. तसेच विशेष मुलांना शैक्षणिक साहित्य भेट म्हणून मिळाले. या क्षणी कामगार वस्तीतल्या डोळ्यांत चमक आणि चेहऱ्यावर हसू एकत्र झळकत होते.
आम्हाला रोज 4-5 किलोमीटर पायी चालून शाळेत जावे लागायचे. आता सायकल मिळाल्यामुळे अभ्यासासाठी वेळ वाचेल, असे एका विद्यार्थ्याने सांगितले. या निरागस शब्दांनी सभागृहातील अनेकांच्या डोळ्यांत पाणी तरळले. या कार्यक्रमाला माजी स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, माजी नगरसेवक लाहुकुमार बेहेते, सोनाली कडू आदी मान्यवर उपस्थित होते. भाजपचे कार्यकर्ते नितीन महाजन, नीलेश राऊत यांनीही उपक्रमात योगदान दिले. हा उपक्रम फक्त सायकलींचे वाटप नव्हता, तर समाजातील गरजा ओळखून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न होता. वाढदिवस म्हणजे फक्त केक, मेणबत्त्या किंवा उत्सव नव्हे, तर लोकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणणारी कृतीही असू शकते, हे संदीप जोशी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नागपूरने अनुभवले.
Nitin Gadkari : आकाशातील सुख जमिनीवर उतरणार, बस होस्टेस भेटीस येणार
