महाराष्ट्राच्या राजकीय रंगभूमीवर स्थानिक निवडणुकीने धुमाकूळ माजवला असून, आता प्रत्येक पक्ष आपल्या वर्चस्वासाठी जोरदार धडपड करत आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वादळ जोरात वाहत आहे. प्रत्येक पक्ष आपली कंबर कसून मैदानात उतरत आहेत. नेत्यांचे बैठक सत्र सुरू झाले आहेत. सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दौरा केला. तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवडणुकीच्या रणनीतीसाठी कानमंत्र दिला. त्यानंतर फडणवीसांनी लगेच कामाला सुरुवात केली. सलग तीन दिवस ते राज्यभर दौरे करत होते. त्यानंतर अजित पवार गटानेही आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी नेत्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केल्या. आता एकनाथ शिंदे गटही या स्पर्धेत मागे राहिला नाही.
शिंदे सेना विदर्भावर विशेष लक्ष केंद्रित करत आहे. जिथे गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना फारसा यश मिळाला नाही. विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. तिथे शिंदे गटाला कमी जागा मिळाल्या होत्या. आता स्थानिक निवडणुकीत असा धक्का बसू नये यासाठी शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. पश्चिम विदर्भात त्यांचे काही आमदार सक्रिय असले तरी, त्यांच्यात एकनिष्ठतेची कमतरता दिसते. ही कमजोरी दूर करण्यासाठी शिंदे स्वतः मैदानात उतरले आहेत. विदर्भातील सर्व आजी-माजी आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना मुंबईला तातडीने बोलावले आहे. हे सर्व जण उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाने धडपडत विदर्भातून मुंबईकडे रवाना झाले आहेत.
विखुरलेल्या सैनिकांची एकत्रता
महायुतीच्या भवितव्याबाबत मोठी अनिश्चितता आहे. महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र येऊन लढण्याची शक्यता जवळपास निश्चित झाली आहे. यामुळे शिंदे सेनेच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची बैठक फक्त स्थानिक निवडणुकींपुरती मर्यादित नाही, तर काही ठोस निर्णय घेण्याची शक्यता आहे. विदर्भ हा भाजपचा गड असल्याने, महायुती झाली तरी शिंदे सेनेला फारशा जागा सोडल्या जाणार नाहीत. स्वबळावर लढावे लागेल आणि आपली ताकद दाखवावी लागेल, असे गणित मांडले जात आहे. या बैठकीची तयारी जोरात सुरू आहे. शुक्रवारी (१७ ऑक्टोबरला) मंत्री दादा भुसे यांच्या मुंबईतील जंजिरा बंगल्यावर विदर्भातील सर्व जिल्ह्यांची बैठक बोलावली गेली.
आधी गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांची एकत्रित बैठक झाली. त्यानंतर वर्धा, चंद्रपूर, नागपूर-रामटेक, अकोला-अमरावती, वाशिम-यवतमाळ आणि शेवटी दुपारी चार वाजता बुलढाण्याची बैठक पार पडली. ही बैठक फक्त रणनीती आखण्यासाठी नव्हती, तर विदर्भातील शिंदे सेनेच्या नेत्यांना एकत्र बांधण्याचा प्रयत्न होता. यवतमाळचे आमदार संजय राठोड आणि रामटेकचे आशिष जयस्वाल मंत्रिमंडळात आहेत. माजी आमदार कृपाल तुमाने आणि माजी खासदार भावना गवळी यांना विधान परिषदेवर घेण्यात आले आहे. तरीही विदर्भात शिंदे सेनेची एकत्रित ताकद दिसत नाही, जणू काही विखुरलेले सैनिक एकत्र येण्याच्या प्रतीक्षेत असावेत. यापूर्वी नागपूरमध्ये बैठक घेण्याचे नियोजन होते, पण राज्यातील अतिवृष्टीमुळे ती पुढे ढकलावी लागली. आता वेळ कमी असल्याने सर्वांना एकाच दिवशी मुंबईत बोलावून निर्णय घेण्याचा प्रयत्न केला.
