महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : शपथपत्राच्या एका चुकीमुळे आमदारकीवर गंडांतर

Bramhapuri Constituency : वडेट्टीवारांच्या विजयावर स्टॅम्प पेपरची सावली

Share:

Author

महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीसंदर्भातील वाद चर्चेचा विषय ठरत आहे. या वादात आता काँग्रेस नेते आणि ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांचंही नाव समोर आलं असून, त्यांच्या आमदारकीवर आता संकटाची टांगती तलवार आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 2024 मधील महाराष्ट्र विधानसभा निवडणूक चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र आता या चर्चेत विजय वडेट्टीवार यांचे नावही जोडल्या जात आहे. नेहमीच चर्चेत राहणाऱ्या ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात एक नवा वाद उफाळून आला आहे. काँग्रेसचे वजनदार नेते आणि तीन वेळा आमदार राहिलेले विजय वडेट्टीवार यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या आमदारकीवर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वडेट्टीवार हे गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या ब्रम्हपुरी विधानसभेतून तिसऱ्यांदा निवडून आले. मात्र, या निवडणुकीवर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

अॅड. नारायण जांभुळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वडेट्टीवार यांच्याविरुद्ध निवडणूक याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी वडेट्टीवार यांच्या शपथपत्रात गंभीर त्रुटी असल्याचा दावा केला आहे. याचिकेनुसार, वडेट्टीवार यांनी 2024 निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात वापरलेला स्टॅम्प पेपर त्यांच्या नावावर नव्हता, तर त्यांच्या पत्नीच्या नावावर होता. विशेष म्हणजे, त्या स्टॅम्प पेपरचा मूळ हेतू अॅग्रीमेंटसाठी होता. पण त्याचाच फेरवापर करून प्रतिज्ञापत्र तयार करण्यात आले आणि त्याचा वापर निवडणुकीसाठी करण्यात आला, असा दावा जांभुळे यांनी केला आहे.

घटनात्मक फसवणुकीचा दावा

याचिकाकर्त्यांनी या प्रकाराला घटनात्मक फसवणूक म्हटले आहे. त्यामुळे वडेट्टीवार यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. या आरोपामुळे सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये खळबळ माजली आहे. अॅड. जांभुळे यांनी याआधीही वडेट्टीवार यांचे नामनिर्देशन रद्द करण्यासाठी निवडणुकीच्या काळात याचिका दाखल केली होती.

मात्र, ती याचिका नियमबाह्य असल्यामुळे न्यायालयाने तिला फेटाळून लावले होते. न्यायालयाने याचिकाकर्त्याला स्पष्ट शब्दांत सुनावले होते की, निवडणूक प्रक्रिया सुरू असताना कलम 329 नुसार न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. त्यावेळी न्यायालयाने त्यांना निवडणूक याचिकेच्या माध्यमातून योग्य मार्ग अवलंबण्याचा सल्ला दिला होता.

Akola : हत्तीच्या पावलांनी निधी येतो, मात्र विकासच ‘मिस्टर इंडिया’ होतो 

यादीतून वगळण्याची मागणी

निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, जांभुळे यांनी कायदेशीर मार्गाने निवडणूक याचिका दाखल केली आहे. 13 जून 2025 रोजी न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. यावेळी निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांना प्रतिवादी यादीतून वगळावे, अशी मागणी झाली. राज्य सरकार आणि याचिकाकर्त्यांनी या प्रकरणावर उत्तर देण्यासाठी मुदत मागितली असून, न्यायालयाने पुढील सुनावणी २० जून रोजी ठेवली आहे.

आता न्यायालय काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे प्रमुख नेते आणि विरोधी पक्षाचे प्रभावशाली चेहरे मानले जातात. अशावेळी त्यांच्यावर असा आरोप होणे, त्यांच्या राजकीय भविष्यावर परिणाम करू शकतो. संपूर्ण प्रकरणामुळे ब्रम्हपुरी मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू ठरत असून, येणाऱ्या दिवसांत या खटल्याची दिशा वडेट्टीवार यांच्या राजकीय प्रवासावर मोठा प्रभाव टाकू शकते.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!