बुलढाण्यात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. मेहकर येथे विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली जोरदार रस्तारोको आंदोलन करण्यात आले.
बुलढाणा जिल्ह्यात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या गंभीर घटनेचा बुलढाणा जिल्ह्यात सर्वत्र तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. मेहकर येथे विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी एकत्र येत संयुक्त रास्ता रोको आंदोलन करत रस्त्यावर ठिय्या दिला.
मेहकरच्या जिजाऊ चौकात दुपारी झालेल्या या आंदोलनात संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटनांचे पदाधिकारी रस्त्यावर उतरले. यावेळी निदर्शन करून प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. आंदोलनाच्या माध्यमातून सर्व संघटनांनी शासनाच्या उदासीनतेवर रोष व्यक्त केला.
Ashish Deshmukh : शेतकऱ्यांच्या न्यायासाठी ठोठावला विधिमंडळाचा दरवाजा
तात्काळ कारवाईची मागणी
मेहकर येथे झालेल्या आंदोलनात मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद, भारत मुक्ति मोर्चा, बामसेफ, जमिअत ए उलेमा हिंद, जमात ए इस्लाम हिंद, भीमशक्ती संघटना, बीएस फोर, गरीब ग्रेड संघटना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), आम आदमी पार्टी, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, छात्रभारती आणि इतर अनेक प्रबोधनवादी संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. रस्त्यावर ठिय्या देत सर्व संघटनांनी एकमुखाने हल्ल्याचा निषेध करत शासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या आंदोलनादरम्यान सर्व पक्षीय आणि सामाजिक संघटनांच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यपाल यांना तहसीलदारांच्या माध्यमातून निषेधाचे निवेदन सादर करण्यात आले.
प्रवीण गायकवाड यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांविरोधात त्वरित कठोर कारवाई करण्याची स्पष्ट मागणी आंदोलकांनी केली. शासन आणि पोलीस प्रशासनाने याप्रकरणात तातडीने लक्ष घालावे, अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. या आंदोलनात परमानंद गारोळे, विश्वनाथ बाहेकर, विलास तेजनकर, पांडुरंग पाटील, दत्ता घनवट, ॲड. विष्णू सरदार, अशोक तुपकर, भागवत जाधव, माधव ससाने, योगेश निकस, सय्यद जावेद, सत्तार शाह अफसर शाह, कैलास सुखदाने, भानुदास पवार यांच्यासह अनेक समाजप्रेमी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
स्पष्ट इशारा
घडलेल्या प्रकरणात संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष मनोज वाघ यांनी शासनावर तीव्र टीका केली. त्यांनी या घटनेचा निषेध करत प्रशासन आणि पोलीस खात्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. जनसुरक्षा कायद्याची ढाल सामान्य जनतेवर गाजवली जात असतानाच भाजपच्या कार्यकर्त्याला मात्र शासनाने संरक्षण दिले असल्याचा आरोप त्यांनी केला. मनोज वाघ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे या प्रकारास शासन आणि पोलीस खात्याच्या निष्काळजीपणाचे प्रतीक ठरवत, अशा विकृतीला ठेचल्याशिवाय संभाजी ब्रिगेड शांत बसणार नसल्याचे ठामपणे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, आमचा इतिहास अन्यायाविरोधात उभा राहण्याचा असून आम्ही लढा देतच राहू.