प्रशासन

MSRTC : धावती शिवशाही बस पुन्हा आगीच्या विळख्यात

Amravati : एसटी महामंडळाच्या ढासाळत्या व्यवस्थापनाचा फटका

Author

अमरावती-यवतमाळ महामार्गावर माहुली चोर गावाजवळ यवतमाळकडे जाणाऱ्या शिवशाही बसला अचानक भीषण आग लागली. चालकाच्या सतर्कतेमुळे तीन प्रवाशांचे प्राण वाचले, मात्र वारंवार घडणाऱ्या अशा घटनांनी प्रवास सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.

यवतमाळकडे जात असलेल्या शिवशाही बसला 22 मार्च शनिवारी दुपारी 3 वाजताच्या च्या सुमारास अमरावती-यवतमाळ महामार्गावर माहुली चोर गावानजीक अचानक आग लागल्याची घटना घडली. अचानक बसच्या केबीनमधून धूर येऊ लागल्याचे लक्षात येताच बसचालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला थांबवली. बसमध्ये केवळ तीन प्रवासी होते. त्यांना आणि वाहकाला वेळेत बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

बस पेटल्याच्या घटनेने महामार्गावर काही काळ गोंधळ उडाला. घटनास्थळी पोलीस तात्काळ दाखल झाले आणि दोन्ही बाजूंची वाहतूक नियंत्रित करण्यात आली. आगीने काही मिनिटांतच भीषण रूप धारण केले होते. परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांनी बघ्यांची गर्दी केल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.

MSRTC : एसटी महामंडळ आर्थिक संकटात, कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारात 

वारंवार आग लागण्याच्या घटना

गेल्या काही महिन्यांत शिवशाही बसला आग लागण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. विशेष म्हणजे, अशा घटनांमध्ये बसचालक व कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अनेकदा जीवितहानी टळली आहे. यापूर्वी 11 ऑक्टोबर 2024 मध्ये अकोलाहून अमरावतीकडे येत असलेल्या शिवशाही बसला बडनेरा पोलीस ठाण्याजवळ अचानक टायर फुटून आगीने ग्रासले होते. त्या वेळीही चालकाने तत्परता दाखवत प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले होते.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) शिवशाही बस सेवा सुरूवातीस अत्याधुनिक व प्रवाशांसाठी आरामदायक समजली जात होती. मात्र, गेल्या काही वर्षांत या बसांच्या देखभालीकडे गंभीर दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट होत आहे. बसचे इंजिन, टायर, वायरींग यांची निगा न राखल्याने अशा तांत्रिक बिघाडांमुळे आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. याशिवाय, बसमध्ये वापरण्यात येणाऱ्या जुनाट उपकरणांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बसच्या देखभालीसाठी आवश्यक निधी, मनुष्यबळ आणि वेळ यांचा अभाव असल्यामुळे ही परिस्थिती तातडीने सुधारेल का, असा प्रश्न उपस्थित होतो.

आगीच्या अशा घटनांमुळे शिवशाही बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रवासाच्या सुरक्षेचा प्रश्न वारंवार ऐरणीवर येत असताना, प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जातील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!