
(या लेखातील मतं ही लेखकाची आहेत. या मतांशी ‘द लोकहित लाइव्ह’ सहमत असेलच असं नाही.)
देशात कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आणि उपचार सुविधांची अपुरी उपलब्धता हे मोठे आव्हान ठरत आहेत.
भारत देशात सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. अनेक रुग्ण या आजाराच्या अभावी गेले आहेत. 2025-26 राष्ट्रीय अर्थसंकल्पात प्रत्येक जिल्हा रुग्णालयात कर्करोग उपचार केंद्रे स्थापन करण्याची महत्त्वाकांक्षी घोषणा करण्यात आली. या योजनेनुसार, प्रत्येक केंद्रात एक विशेषज्ञ डॉक्टर, दोन परिचारिका, एक फार्मासिस्ट आणि एक बहुउद्देशीय कामगार असणे आवश्यक आहे. मात्र, वास्तविकतेकडे पाहिले तर देशात कर्करोग तज्ञ डॉक्टरांची संख्या अत्यंत अपुरी आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कर्करोग तज्ञांची अचूक उपलब्धता किती आहे, याबाबत ठोस माहिती नाही. अंदाजानुसार देशात किमान दोन हजार कर्करोग तज्ञांची कमतरता जाणवत आहे.

यातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सध्याचे डॉक्टर मोठ्या प्रमाणावर शहरांमध्ये कार्यरत आहेत. तर ग्रामीण भागात त्यांची उपस्थिती अत्यंत मर्यादित आहे. ग्रामीण भागातील कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र तेथे तज्ञांची अनुपलब्धता ही एक गंभीर समस्या ठरत आहे. त्यामुळे या कर्करोग उपचार केंद्रांच्या यशस्वितेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.
निदानाचे महत्त्व
भारतामध्ये कर्करोग जनजागृती अजूनही अत्यल्प आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, देशात सरासरी एक लाख लोकांमध्ये फक्त शंभर लोकांना कर्करोगाचे निदान होते. ही आकडेवारी दर्शवते की बहुतांश प्रकरणांमध्ये कर्करोगाची ओळख उशिरा होते आणि त्यामुळे उपचार अत्यंत कठीण होतात.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) 2023 अहवालानुसार, देशात14 लाखांहून अधिक नोंदणीकृत कर्करोग रुग्ण होते. पण ही संख्या प्रत्यक्षात दीड ते तीन पट अधिक असू शकते. विशेषतः स्तन, गर्भाशय ग्रीवा आणि तोंडाच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी काही सरकारी योजना कार्यरत आहेत, पण निदानाचे प्रमाण जगात सर्वात कमी आहे.
संभाव्य उपाय
केंद्र सरकारने कर्करोग उपचार केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला असला, तरी अनेक रुग्णालयांमध्ये डॉक्टर, योग्य चाचणी उपकरणे आणि त्वरित उपचार सुविधा यांची मोठी कमतरता आहे. राजधानी दिल्लीतही कार्यरत असलेल्या कर्करोग सेवा केंद्रांमध्ये अनेकदा डॉक्टरांची अनुपस्थिती, जुनी किंवा निकामी उपकरणे आणि दीर्घ प्रतीक्षा वेळ अशी आव्हाने दिसून येतात.
काही राज्यांमध्ये, विशेषतः केरळ आणि ईशान्य भारतातील काही जिल्हा रुग्णालयांमध्ये कर्करोग उपचार केंद्रे कार्यरत आहेत. मात्र, त्यांचा प्रत्यक्ष प्रभाव किती आहे याची ठोस माहिती नाही. ग्रामीण भागात फिरते दवाखाने पाठवण्याचा सरकारचा विचार स्वागतार्ह आहे, पण ते तज्ञ डॉक्टरांची कमतरता भरून काढू शकतील का, हा प्रश्न कायम राहतो.
भविष्यातील धोरण
ग्रामीण भागातील लोक कर्करोगाच्या निदानासाठी पुढे येत नाहीत, विशेषतः महिला. त्यामुळे सरकारने घरोघरी तपासणी केंद्रे सुरू करणे, टेलिमेडिसिन तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग करणे आणि नॅशनल कॅन्सर ग्रिडच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी तज्ज्ञांना जोडणे, हे उपाय प्रभावी ठरू शकतात. लोकांना कर्करोग निदान आणि उपचाराची महत्त्वाची माहिती मिळावी, यासाठी व्यापक जनजागृती मोहिमा हाती घेणे गरजेचे आहे. अन्यथा, वाढत्या संख्येतील रुग्णांसाठी आगामी वर्षे आणखी कठीण ठरू शकतात.