विदर्भातील मुसळधार पावसाने नागपूरसह अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण केली आहे. प्रशासनाने ९ जुलैला सुट्टी जाहीर केली आहे.
राज्यात पावसाने सध्या रौद्र रूप धारण केले आहे. विशेषतः विदर्भात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत जोरदार पावसामुळे वैनगंगा नदीला पूर आला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. वाहतुकीचे रस्ते बंद झाले आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नागपूर जिल्ह्यात देखील पावसाने प्रचंड बॅटिंग करत गेल्या २४ तासांत तब्बल ११४.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. परिणामी, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ९ जुलै २०२५ रोजी जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी सुट्टी जाहीर केली आहे. राज्य शासनाकडून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गेल्या चोवीस तासांतील पावसाचा तपशील पाहता भिवापूर तालुक्यात सर्वाधिक ११८.६ मिमी, तर मौदा, रामटेक, काटोल या तालुक्यांमध्येही १०० मिमीच्या घरात पावसाची नोंद झाली आहे. नागपूर शहरात ६७.८ मिमी आणि ग्रामीण भागात ६४.७ मिमी पाऊस झालाय. एकूणच जिल्ह्यात आतापर्यंत १४८.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जी हंगामाच्या ४८.९ टक्के इतकी भरलेली आहे. या स्थितीत नागपूर शहरात अनेक भागांत पाणी साचले आहे. नाल्यांचे प्रवाह भरून वाहू लागले आहेत. सार्वजनिक जीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना वाहतुकीच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
Nagpur : स्मार्ट घोटाळ्याचे स्मार्ट सूत्रधार; कागद हरवले, आरोपी फरार
मदतकार्य युद्धपातळीवर
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून जनतेला घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. नागपूर शहरात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. आजही (९ जुलै) मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. नागरिकांनी आवश्यकता नसताना घराबाहेर पडू नये, असं आवर्जून सांगताना त्यांनी एनडीआरएफ व एसडीआरएफसह सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या काही तासांत पूरग्रस्त ठिकाणी मदतकार्य सुरू झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रशासन युद्धपातळीवर काम करत असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असेही ते म्हणाले.
दरवर्षी प्रमाणेच यंदाही पावसाच्या पहिल्याच सरीत नागपूर शहर पाण्यात बुडाले आहे. महापालिकेने पावसाळ्यापूर्वी केलेल्या तयारीच्या दाव्यांना पहिल्याच पावसात चांगलाच सुरुंग लागलेला दिसतो आहे. नाल्यांची स्वच्छता, जलवाहिनी व्यवस्थापन, पाणी साचणारे ठिकाणे यावर उपाययोजना झाल्या असल्याचे महापालिकेचे सांगणे होते. मात्र प्रत्यक्षात पाणी साचलेली घरं, बंद रस्ते आणि खोळंबलेली वाहतूक नागपूरच्या प्रशासनिक व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत आहे.पावसाळ्याची सुरुवातच जर अशी झाली असेल तर पुढील आठवड्यात होणारा संभाव्य पाऊस अधिक धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे प्रशासनाचे आवाहन आहे की, सावध रहा, सुरक्षित रहा. कोणतीही आपत्कालीन घटना घडू नये यासाठी शासकीय यंत्रणा कार्यरत आहेतच, पण नागरिकांनी देखील जबाबदारीने वागणे गरजेचे आहे.