प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारांच्या रणभूमीतच लढण्याचा आमचा संस्कार असल्याचे ठामपणे सांगितले. हातात तलवार नाही, तर विचारांचा झेंडा, असा स्पष्ट संदेश त्यांनी हिंसेला विरोध करत दिला.
राजकारणात शाब्दिक शरसंधान असो, पण संस्कृतीच्या सीमारेषा ओलांडल्या गेल्या तर, संघर्ष वैचारिक नसून विध्वंसक ठरतो. अशा भ्याड हल्ल्यांना आमचा ठाम विरोध आहे, असं ठणकावून सांगताना भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जोरदार शब्दांत निषेध केला.
पत्रकार परिषदेत पत्रकारांसमोर बोलताना बावनकुळे म्हणाले, प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याला कोणताही आधार नाही. आम्ही या प्रकाराचा निषेध करतो. विचारसरणीची लढाई आम्ही डंके की चोटवर लढू, पण असं भ्याड आचरण आमच्या संस्कृतीत बसत नाही. कोणत्याही पक्षाचा, पदाचा किंवा नावाचा हल्लेखोर आमचा नाही.
डोळ्यात अंजन
दीपक काटे यांच्या कृतीवरूनही बावनकुळे यांनी भूमिका स्पष्ट करत ठामपणे सांगितले की, अडीच वर्षांपूर्वी त्याने प्रवेश घेतल्यावर मी म्हणालो होतो की, तो चांगलं काम करेल. मात्र आज त्याने जी चूक केली ती आमच्याही डोळ्यात अंजन घालणारी आहे. त्याच्यावर पोलिस कारवाई झालीच आहे, आणखी होईल. पण त्याच्या चुकीस पाठिंबा कोणताही भाजप कार्यकर्ता किंवा पदाधिकारी देणार नाही.
त्यांनी पुढे असंही सांगितलं की, माझ्यावर आजवर जातीय राजकारणाचे कोणतेही आरोप झालेले नाहीत. ना अनिल देशमुखांसारख्या विरोधकांकडून, ना कोणी इतरांकडून. कारण आमची भूमिका नेहमीच समतोल आणि मूल्याधिष्ठित राहिली आहे. आम्ही रस्त्यावर नव्हे, विचारांच्या रणभूमीवर उतरतो.
गावांचा पेच सुटणार
फक्त राजकीय नव्हे, तर सीमावादासंदर्भातही चंद्रशेखर बावनकुळे यांनी आश्वासक बातमी दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील 14 सीमावर्ती गावांचा तेलंगणा विरुद्ध महाराष्ट्र हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. त्यावर निर्णय घेऊन महाराष्ट्र शासनाने यावर शिक्कामोर्तब केलं आहे की ही सर्व गावे महाराष्ट्रातच राहणार.
या 14 गावांचे व्यवहार जरी दोन्ही राज्यांत होत असले तरी गावठाण व मतदारसंघ महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही हे गावे महाराष्ट्रातच राहतील. याचा अधिकृत नोंद महाराष्ट्र शासनाकडे आहे. त्यामुळे सीमारेषेवरील तणावही कमी होईल आणि नागरिकांमध्ये स्पष्टता निर्माण होईल,” अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.
हिंसाचाराला नाही पाठिंबा
बावनकुळे यांचा एकंदर संदेश स्पष्ट आहे की, भविष्यात भाजपचा प्रवास मूल्याधिष्ठित असेल, जातीय राजकारण, हल्लेखोरी किंवा व्यक्तिकेंद्रित द्वेषाच्या पायावर नव्हे. त्यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ल्याचे समर्थन करणाऱ्यांनाही इशाराच दिला आहे. यामधून स्पष्ट होतं की, चंद्रशेखर बावनकुळे हे केवळ पक्षाचे नेते नसून, विचारांचा झेंडा उंच ठेवणारे धोरणकर्ते आहेत. राजकारणात सौजन्य, सामाजिक समरसतेचा विचार आणि कायद्याचा आदर यावर त्यांनी पुन्हा एकदा ठाम मोहर उमटवली आहे.
