राज्यात सध्या एकीकडे महाभियोगाच्या राजकीय वादळाने तापलेले वातावरण आहे, तर दुसरीकडे अवकाळी पावसाच्या संकटाने शेतकऱ्यांचे हाल वाढवले आहेत. शासन मात्र लोकांच्या सुरक्षेसाठी आणि मदतीसाठी सज्ज असल्याचे स्पष्ट दिसते.
राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा महाभियोगाचा मुद्दा पेटवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत असताना, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याला सरळसरळ लोकांची दिशाभूल आणि राजकीय नौटंकी असे संबोधले. त्यांनी स्पष्ट केले की, निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर शंका घेणे हा लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत करण्याचा प्रयत्न आहे.
बावनकुळे यांनी ठामपणे सांगितले की, महाभियोगाची तयारी हा केवळ राजकीय दिखावा असून वास्तवाशी त्याचा काहीही संबंध नाही. निवडणूक आयोगाने संपूर्ण प्रकरणाचे बारकाईने परीक्षण केले असून, निष्पक्षतेवर डाग आणण्याचा कोणताही प्रयत्न राष्ट्रहिताला धक्का देणारा आहे.
Supreme Court : सहाच्या छायेत बहात्तर लाख मतांचा आरोप कोसळला
अवकाळी पावसाचा तडाखा
राज्याच्या शेतकऱ्यांवर निसर्गाने पुन्हा एकदा कहर केला आहे. पश्चिम विदर्भातील वाशीम, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यांसह महाराष्ट्रातील अनेक भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे चार लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतजमिनींचा अक्षरशः चुराडा झाला असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने आपत्ती व्यवस्थापन निधी विड्रॉल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. ज्यांची घरं वाहून गेली आहेत, ज्यांना विस्थापित व्हावे लागले किंवा बचाव पथकांमार्फत सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले, अशा नागरिकांना त्वरित मदत पोहोचविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासनाने परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.
हवामान विभागाने राज्यातील 15 जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि जिल्हा प्रशासनाचे पथक सतत सक्रिय आहे. महसूल मंत्री बावनकुळे, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिघेही प्रत्यक्ष परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पूरग्रस्त भागांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे, तातडीने अन्नधान्य, वैद्यकीय मदत व निवाऱ्याची व्यवस्था करणे, तसेच पंचनाम्यांची प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे यावर प्रशासनाने कडक लक्ष केंद्रीत केले आहे. शासनाच्या सर्व यंत्रणा एकदिलाने काम करत असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, हे स्पष्ट संकेत सरकारने दिले आहेत.
Prashant Padole : शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी दिल्ली दरबारात जोरदार आवाज
संवेदना व्यक्त
राजकीय गोंधळ आणि नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर वैयक्तिक दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यानंतर राज्यभरातून शोक व्यक्त होत आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या घरी जाऊन श्रद्धांजली वाहिली. देव त्यांना या दुःखातून सावरण्याचे सामर्थ्य देवो, अशी प्रार्थना केली. राज्यात एका बाजूला राजकीय संघर्ष तापलेला असताना दुसऱ्या बाजूला निसर्गाच्या आपत्तीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून लोकांच्या सुरक्षेला आणि मदतीला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. लोकशाहीच्या पवित्र संस्थांना डाग न लावता शासनाच्या उत्तरदायित्वाची जाणीव जपली जात असल्याचे स्पष्टपणे जाणवते.
