
कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या विकासासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्री संजय शिरसाट यांची भेट घेतली. या भेटीच्या निमित्ताने निधी वाटप, सामाजिक न्याय विभाग आणि विकास कामांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने असलेल्या माझी लाकडी बहिण या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आल्याच्या चर्चेमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्री संजय शिरसाट यांची भेट घेऊन महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली.
भेटीत स्थानिक विकासाच्या अनुषंगाने कामठीच्या बुद्ध पॅलेस संदर्भात महत्त्वपूर्ण मुद्दे मांडण्यात आले. प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी ही भेट केवळ ड्रॅगन टेम्पलच्या विकासकामासाठीच असल्याचे स्पष्ट केले. या जागेचा वापर, विकास आराखडा, निधी मंजुरी आणि प्रारंभाच्या तारखा आदी मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.

समन्वयात्मक बैठक
ड्रॅगन टेम्पलच्या कामांना वेग देण्यासाठी माजी मंत्री सुलेखा कुंभारे, मंत्री संजय शिरसाट आणि स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकत्र येऊन पुढील रणनीती ठरवली. ही जागा केवळ धार्मिक महत्त्वाचीच नाही, तर ती स्थानिक रोजगार, पर्यटन आणि सांस्कृतिक वारशाला चालना देणारी ठरणार आहे. म्हणूनच, या कामाची प्राथमिकता वाढवण्यात आली आहे. संजय शिरसाट हे स्वतः या स्थळाला भेट देणार आहेत. लवकरच या विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
विकासकामांसाठी निधी मिळवण्याच्या प्रक्रियेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, अजित पवार हे प्रत्येक विभागाच्या मंत्र्यांशी थेट चर्चा करून निधीचे अचूक वाटप करतात. ही प्रक्रिया पारंपरिक पद्धतीने सातत्याने राबवली जात आहे. यावेळी देखील प्रत्येक मंत्री आपल्या विभागासाठी आवश्यक निधीवर चर्चा करणार आहे. यामध्ये सामाजिक न्याय, आरोग्य, ग्रामविकास अशा विविध विभागांचा समावेश आहे.
Chandrashekhar Bawankule : तिघांचा सूर एकच; नाटक नाही, कामच होणार
श्रद्धास्थळांचे सन्मान
सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास हे सरकारसाठी अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचे विभाग आहेत. यासाठी राखीव ठेवण्यात येणारा निधी अन्य कोणत्याही योजनेसाठी हस्तांतरित केला जात नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. कधी कधी विलंब होतो, परंतु निधीचा अन्यत्र वापर केला जात नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने या विभागांसोबत नेहमीच न्याय केला आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
घडलेल्या संपूर्ण घडामोडींकडे पाहताना स्पष्ट होते की, सरकार एकीकडे विकासकामांना चालना देत आहे, तर दुसरीकडे विविध समाजघटकांच्या भावनांचाही सन्मान राखत आहे. ड्रॅगन टेम्पल हे केवळ धार्मिक स्थळ नसून एक सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यटन दृष्टिकोनातून महत्त्वाचे केंद्र बनू पाहत आहे. या कामासाठी मिळणारा निधी, प्रशासनाची तत्परता आणि नेत्यांचा सहकार्यभाव, हे या पुढाकाराचे यश सुनिश्चित करणारे घटक आहेत.