महाराष्ट्र

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या आकडेवारीने गांधींचे उधळले आरोप 

Rahul Gandhi : मतदारसंख्येच्या वाढीवरून रंगलेल्या सत्तासंघर्षाचं प्रतिकात्मक दर्शन 

Post View : 1

Author

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील मतदारसंख्येत संशयास्पद वाढ झाल्याचा आरोप करत राहुल गांधींनी थेट मतांची चोरी झाल्याचा दावा केला आहे. मात्र फडणवीसांनी आकडेवारीच्या आधारे राहुल गांधींच्या आरोपांना जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वादाचा भडका उडाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात अवघ्या पाच महिन्यांत झालेल्या मतदारसंख्येतील वाढीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ही “मतांची चोरी” असल्याचा गंभीर आरोप केला आहे. काही मतदान केंद्रांवर 20 ते 50 टक्क्यांपर्यंत मतदार वाढ झाल्याचा दावा करत राहुल गांधींनी निवडणूक आयोगालाही या प्रकरणात गप्प का आहात, असा थेट सवाल विचारला आहे.

राहुल गांधींनी हा आरोप करताना सांगितलं की, बीएलओ अर्थात बूथ लेव्हल अधिकाऱ्यांनी त्यांच्या अहवालात अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याची नोंद केली आहे. माध्यमांनीही विना सत्यापित पत्ते असणाऱ्या हजारो मतदारांचा शोध घेतल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे ही केवळ हेराफेरी नसून स्पष्ट स्वरूपात मतांची चोरी आहे. हे प्रकरण लपवण्याचा प्रयत्नच म्हणजे कबुली आहे, असं सांगत त्यांनी ‘मशीन-रीडेबल डिजिटल मतदार यादी’ व ‘सीसीटीव्ही फुटेज’ तातडीने प्रसिद्ध करण्याची मागणी केली.

पराभवाचे दुःख

या आरोपांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून आकडेवारीसह जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी ‘झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो’ अशा शब्दांत सुरुवात करत राहुल गांधींवर टीका केली. फडणवीस म्हणाले की, तुमच्या महाराष्ट्रातील पराभवाचे दुःख दिवसेंदिवस वाढत आहे, हे मी मान्य करतो. पण तुम्ही किती काळ हवेत बाण सोडत राहणार आहात?” त्यांनी हेही नमूद केलं की, महाराष्ट्रात 25 पेक्षा जास्त मतदारसंघ आहेत, जिथे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान आठ टक्के पेक्षा जास्त मतदार वाढले आहेत आणि अनेक ठिकाणी काँग्रेसने विजय मिळवला आहे.

Youth Addiction : अंमली पदार्थांचे वाढते साम्राज्य

त्यांनी याचे काही ठळक उदाहरणेही दिली. पश्चिम नागपूर मतदारसंघात सात टक्के मतदार वाढ झाली आणि काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे विजयी झाले. उत्तर नागपूरमध्येही सात टक्के वाढ झाली आणि नितीन राऊत विजयी झाले. पुणे जिल्ह्याच्या वडगाव शेरीत 10 टक्के वाढ असून शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे विजयी झाले. मुंबईतील मालाड पश्चिममध्ये 11 टक्के वाढ असून काँग्रेसचे अस्लम शेख विजयी झाले, तर मुंब्रामध्ये नऊ टक्के मतदारवाढ असून जितेंद्र आव्हाड यांनी विजय मिळवला आहे.

काँग्रेसमध्ये संवादाचा अभाव

या उदाहरणांच्या आधारे फडणवीसांनी म्हटलं की, राहुल गांधींनी आरोप करण्याआधी आपल्या पक्षाच्या किंवा मित्रपक्षाच्या नेत्यांशी एकदा चर्चा केली असती, तर हे आरोप हास्यास्पद ठरले नसते. फडणवीसांनी सूचित केलं की काँग्रेसमध्येच संवादाचा अभाव आहे आणि राहुल गांधी हवेत बाण सोडून केवळ दिशाभूल करत आहेत.

या संपूर्ण पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर नव्याने चर्चा सुरु झाली आहे. हे आरोप निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्न निर्माण करत आहेत. दरम्यान, राज्यातील जनतेच्या मनात यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील राजकीय हालचालींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!