स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे राजकीय वर्तुळात सध्या जोरात वाहत आहेत. मात्र महायुतीच्या मित्रपक्षात पुन्हा एकदा खदखद आणि अंतर्गत मतभेद व्यक्त होताना दिसत आहेत.
महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या नवा ड्रामा रंगतोय. महायुती सरकारच्या मित्रपक्षांमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर येतंय. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि भाजपचे ‘मास्टर स्ट्रॅटेजिस्ट’ देवेंद्र फडणवीस यांच्यातील अंतर्गत खटके उघड होतायत. 2024 विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सत्तेत आली. पण मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कोणाला मिळणार, यावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये चांगलाच रस्सीखेच चालला होता. अखेर फडणवीसांनी बाजी मारली आणि शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले. पण, या निर्णयाने शिंदे गटातली खदखद कायम आहे.
आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस यांच्यात ‘कोल्ड वॉर’ पेटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय. फडणवीसांनी शिंदेंच्या नगरविकास खात्यावर साधला निशाणा. केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी बोलावलेल्या एका बैठकीत फडणवीसांनी शिंदेंच्या खात्याला चांगलेच धारेवर धरले. नगरविकास खात्याची कामगिरी सुमार आहे. तातडीने सुधारणा करा, असा तडाखेबंद आदेश फडणवीसांनी अधिकाऱ्यांना दिला. विशेष म्हणजे, या बैठकीला खुद्द एकनाथ शिंदे गैरहजर होते. इतर सर्व मंत्री हजर असताना शिंदेंची अनुपस्थिती राजकीय वर्तुळात भुवया उंचावणारी ठरली.
Nagpur Marbat Festival : पोलीस आयुक्तांनाही आवरला नाही फोटोग्राफीचा मोह
अमृत योजनेत कामचुकारपणा
देवेंद्र फडणवीसांनी केंद्राच्या ‘अमृत 2.0’ योजनेच्या अंमलबजावणीत शिंदेंच्या खात्याने केलेल्या कामचुकारपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना चांगलेच कानपिचक्या दिल्याचे बोलले जात आहे. फडणवीसांनी बैठकीत नगरविकास खात्याला उद्देशून सवाल उपस्थित केला. केंद्राने अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठा, स्वच्छता, ग्रीन पार्क आणि शहरीकरणासाठी कोट्यवधींचा निधी दिलाय. पण तुम्ही त्याचा वापर कसा केलात? यावर अधिकाऱ्यांकडे समाधानकारक उत्तर नव्हते. फडणवीसांनी कंत्राटदारांना कामी मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश देत, आता तरी कामाला गती द्या, असा स्पष्ट इशारा दिला.
विशेष बाब म्हणजे, 2022 मध्ये शिंदेंनी शिवसेनेतून बाहेर पडत भाजपशी हातमिळवणी केली आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवले. तेव्हाही त्यांच्याकडेच नगरविकास खाते होते. आता फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावरही शिंदेंकडे हे खाते आहे. पण त्यांच्या कामगिरीवर फडणवीसांचा राग अनावर झालाय. शिंदे गट आणि भाजपमधील हा तणाव नवीन नाही. फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर शिंदे गटाच्या अनेक योजनांना खीळ बसली. तर काही नेत्यांची झेड प्लस सुरक्षा काढून टाकण्यात आली. यामुळे शिंदे गटात नाराजीचा सूर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
ShivSena : धार्मिक उत्साहातून शिंदे साहेबांची महापालिकेच्या रणांगणात आघाडी
शिंदे गटाला आपली ताकद दाखवायची आहे. तर फडणवीस आपल्या खणखणीत कार्यशैलीने महायुतीत वर्चस्व राखण्याच्या प्रयत्नात आहेत. या सत्तासंघर्षात कोण बाजी मारणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पण एक गोष्ट नक्की, महायुतीत सध्या ‘ऑल इज नॉट वेल’.
