महाराष्ट्र

Nagpur : भविष्यासाठी मोबिलिटी म्हणजे प्रगतीचे विमान अन् देवाभाऊ त्याचे पायलट

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या 30 वर्षांच्या दृष्टीकोनातून भविष्याची वाटचाल

Author

नागपूरच्या रस्त्यांपासून उड्डाणपूलांपर्यंतचा प्रवास आता नियोजनबद्ध होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने 30 वर्षांचा मोबिलिटी प्लॅन तयार झाला असून तो लवकरच जनतेसमोर सादर केला जाणार आहे.

सध्याचा नागपूर बघा आणि येणारा 2055 मधील नागपूर उभा करा डोळ्यासमोर. होय, नागपूर जिल्ह्याच्या पुढील 30 वर्षांच्या प्रवासासाठीचा नकाशा आता तयार झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नागपूरच्या प्रगतीसाठी ‘कॉम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन’ अर्थात सर्वसमावेशक वाहतूक आराखडा लोकप्रतिनिधींसमोर ठेवण्यात आला. राईट्स (RITES) या नामवंत तांत्रिक संस्थेला या आराखड्याच्या तयारीची जबाबदारी देण्यात आली होती आणि त्यांनी सविस्तर व दूरदृष्टीने आखलेला आराखडा तयार केला आहे.

या मोबिलिटी प्लॅनमध्ये नागपूर शहर आणि जिल्ह्यातील सध्याच्या वाहतूक अडचणी, संभाव्य वाढीव लोकसंख्या, नवीन औद्योगिक व निवासी हब्स आणि भविष्यातील शहरी विस्तार यांचा बारकाईने विचार करण्यात आला आहे. यामुळे सध्याचे नागपूर हे एका नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध शहरात रूपांतरित होण्याच्या मार्गावर आहे.

Bhandara : सहकाराच्या सिंहासनावर फुके-पटेल विराजमान, नानांचे मनसुबे धुळीस

प्रभावी सेवा

आराखड्यात मुख्यतः रस्त्यांचे रुंदीकरण, नवीन रस्ते बांधणे, अंडरपास, ओव्हरब्रिज आणि उड्डाणपूलांची निर्मिती, स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल्स, पादचारी मार्ग (फुटपाथ), सार्वजनिक वाहतुकीसाठी प्रभावी बस सेवा आणि सायकल ट्रॅक आदी घटकांचा समावेश आहे. केवळ रस्त्यांपुरतेच मर्यादित न राहता, नागपूरमधील लोकांची ‘प्रवासी सुलभता’ ही या आराखड्याची प्रमुख प्रेरणा आहे.

या प्लॅनमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या नागपूर शहर केंद्राव्यतिरिक्त भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या ‘क्रोध सेंटर’ या गट-केंद्रांचा वेध घेतला गेला आहे. या संभाव्य विस्तार भागांमध्ये भविष्यात होणाऱ्या लोकवस्तीच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी तेथे आधीच वाहतूक आणि पायाभूत सुविधा विकसित करण्याचे नियोजन केले गेले आहे. त्यामुळे आराखडा केवळ वर्तमान केंद्रित नसून, तो भविष्यासाठी भक्कम पाया घालणारा आहे.

Devendra Fadnavis : सहकार सूतगिरण्यांना ऊर्जा, उमेद आणि दिशा

अभिप्राय नोंदवण्याची संधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की, हा कॉम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन लवकरच नागपूरच्या जनतेसमोर खुला करण्यात येईल. नागरिकांना त्यावर त्यांच्या सूचना, मते आणि अभिप्राय नोंदवण्याची संधी दिली जाणार आहे. त्या अभिप्रायांवर आधारित सुधारणा केल्या जातील. ही प्रक्रिया प्रशासनाच्या पारदर्शकतेचे आणि लोकसहभागाच्या मूल्यांचे उत्कृष्ट उदाहरण ठरेल.

नागपूर हे मध्य भारतातील एक वाढतं शहर असून, मिहान, लॉजिस्टिक हब, समृद्धी महामार्ग, मेट्रो आणि औद्योगिक विकासाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीच्या नियोजनाचा महत्वाकांक्षी आराखडा गरजेचा ठरत आहे. त्यामुळे फडणवीस सरकारचा हा मोबिलिटी प्लॅन म्हणजे नागपूरच्या विकासाची ‘नाडी’ आहे.

भविष्याचा आराखडा

शिस्तबद्ध शहरव्यवस्थेसाठी, प्रत्येक नागपूरकराला सुरक्षित, सुलभ आणि जलद प्रवासासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. नागपूरसारख्या शहरासाठी अशा व्यापक दृष्टीकोनातून आखलेला आराखडा भविष्यात इतर जिल्ह्यांनाही प्रेरणा देणारा ठरेल.

सारांशत: नागपूरच्या वाटचालीसाठी फडणवीस सरकारने उचललेले हे पाऊल केवळ रस्त्यांचं नाही, तर नागपूरच्या प्रगतीच्या प्रवासाचं दिशादर्शन करणारे आहे. जनतेचा सहभाग, प्रशासनाची पारदर्शकता आणि तांत्रिकतेचा आधार या त्रिसूत्रीवर आधारित हा आराखडा, ‘स्मार्ट नागपूर’ च्या स्वप्नाला साकार करत आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!