महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : फडणविसांचं भाषिक मुखवटा, बावनकुळेचं मौन 

Congress : हर्षवर्धन सपकाळ यांचा पुन्हा संघ आणि भाजपावर कडाडून हल्ला

Post View : 1

Author

हिंदी सक्तीचा निर्णय म्हणजे मराठीवर अन्याय आहे, असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. भाजपाच्या भाषिक अजेंड्याचा त्यांनी तीव्र निषेध केला.

हिंदी हा आमचाही अभिमान आहे, पण ती आमच्यावर लादली गेली, तर ती शिस्त नव्हे तर जबरदस्ती ठरेल. अशा जळजळीत शब्दांत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तीव्र हल्ला चढवला आहे. महाराष्ट्र सरकारच्या इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयावरून राज्यभरात निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी स्पष्ट केले, हे भाषा धोरण नव्हे, तर मराठीची गळचेपी करणारा कपटकारस्थानाचा भाग आहे.

भाषा म्हणजे केवळ संवादाचे माध्यम नसून ती एखाद्या समाजाचा आत्मा असते, असा ठाम विश्वास व्यक्त करत सपकाळ म्हणाले, “मराठी आमच्या श्वासात भिनलेली आहे, ती आमची बोली नाही, ती आमचं अस्तित्व आहे. ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रात सक्तीने हिंदी लादण्याचा हा जो संघ व भाजपाचा डाव आहे, तो फसणार आहे. आम्ही तो हाणून पाडू.

महाराष्ट्रातच हिंदी का?

भाजपाच्या धोरणावर थेट प्रश्न उपस्थित करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदी शिकवली जात नाही, मग महाराष्ट्रातच ही सक्ती का? भाजपाच्या ‘वन इंडिया, वन लेंग्वेज’ कल्पनेमुळे राज्यांच्या सांस्कृतिक स्वतंत्रतेवर गदा येते. हे धोरण केंद्र सरकार गुजरातमध्ये लागू करत नाही, कारण तिथे त्यांचा ‘राजकीय किल्ला’ आहे. पण महाराष्ट्रात मात्र ते भाषा लादतात! हाच दुटप्पीपणा आम्ही उघड करत आहोत.

संघप्रेरित विचारधारेवरही सपकाळ यांनी घणाघाती टीका केली. गोलवलकर यांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकावर भाजपाचे दोन्ही नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. त्या पुस्तकात विविध भाषांबाबत असहिष्णु दृष्टिकोन आहे. आज त्याच विचारसरणीचा अंमल महाराष्ट्रात घडतोय, अशी सपकाळ म्हणाले.

भाषा हा भावनिक मुद्दा

सपकाळ म्हणाले, हिंदीविरोधात नाही, पण सक्तीविरोधात आहोत. हे राजकीय नव्हे, तर भावनिक आणि सांस्कृतिक लढा आहे. कोणत्या पक्षाचे आंदोलन, कोणाच्या निमंत्रणावर आलो, यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे, महाराष्ट्राचं भाषिक अस्तित्व वाचवणं. त्यांनी साहित्यिकांना आवाहन केलं आहे की, मराठीवर आलेले संकट ही फक्त राजकीय गोष्ट नसून ती साहित्य-संस्कृतीची हाक आहे. साहित्यिकांनीही पुढे यावं.

हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट शब्दांत राज्य सरकारला इशारा दिला की, हिंदी सक्तीचा आदेश आम्ही मान्य करणार नाही. तो रद्द करण्यात यावा, अन्यथा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन उभं राहील. ते म्हणाले, मराठीवर प्रेम करणारा प्रत्येक नागरिक या संघर्षात आमचा साथीदार ठरेल. आम्ही कोणत्याही थराला जाऊ, पण मराठीची शान अबाधित ठेवू.

आरती जोशी | Aarti Joshi

आरती जोशी | Aarti Joshi

आरती जोशी या द लोकहित लाइव्ह येथे रिपोर्टर आणि टेक्निकल विभागाच्या सहाय्यक प्रमुख देखील आहेत. कॉम्प्युटर विषयात त्यांनी वेबसाइट डेव्हलपमेंट, मोबाइल अॅप डेव्हलपमेंट आणि कोडिंग याचेही उच्च शिक्षण प्राप्त केले आहे.

More Posts - Website

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!