विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने आता नवीन प्रदेशाध्यक्ष नेमला आहे. माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे पद गेले असले तरी त्यांची उंच भरारी अद्यापही कायम आहे.
आमदार नाना पटोले यांच्या जागेवर हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. आता नाना पटोले यांच्याजवळ पक्षातील एकही मोठे पद नाही. याचा कोणताही परिणाम नाना पटोले यांच्यावर झालेला नाही. नवीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नियुक्त झाल्यानंतर नाना सध्या ‘स्ट्रेस फ्री मूड’ मध्ये दिसत आहेत. सातत्याने खादीमध्ये फिरणारे नाना आता फॉर्मल कपड्यांमध्ये दिसू लागले आहेत.
नाना पटोले यांनी अलीकडेच ‘पॅराग्लायडिंग’चा आनंद लुटला. पटोले यांनी पॅराग्लाइडिंगचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. त्यामध्ये नाना पटोले आकाशात उंच उडण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. भाजपमधून काँग्रेसमध्ये आल्यानंतर नाना पटोले यांना सुरुवातीला किसान आघाडी प्रमुख करण्यात आलं. त्यानंतर त्यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची जबाबदारी सोपवण्यात आली. लोकसभा निवडणुकीमध्ये नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेसने नेत्रदीपक यश मिळवले. त्यानंतर नाना पटोले हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार बनले.
पक्षांतर्गत विरोध
विधानसभा निवडणुकीत पटोले यांना पाहिजे तसा जलवा दाखवता आला नाही. पराभवाचे खापर महाविकास आघाडी ईव्हीएमवर फोडण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु पराभव का झाला, याची नेमकी कारणे काँग्रेसला ठाऊक आहेत. त्यामुळेच निकाल लागताच पटोले विरोधकांनी पुन्हा डोके वर काढले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे नाना पटोले यांची तक्रार झाली. नाना पटोले यांनी देखील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद शोधण्यासाठी राजीनामा दिला. हा राजीनामा काँग्रेस ‘हायकमांड’ने अनेक दिवसांपर्यंत ‘होल्ड’वर ठेवला होता.
अलीकडेच बुलढाण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. आता नाना पटोले यांना केंद्रीय स्तरावर मोठी जबाबदारी देण्याची तयारी सुरू आहे. काँग्रेसने ही तयारी सुरू केली आहे. त्यामुळेच कदाचित पटोले पद गेल्यानंतरही ‘टेन्शन फ्री’ दिसत आहेत. अलीकडेच नाना पटोले आणि राहुल पटोले यांनी पॅराग्लायडिंग केले. त्यावेळी नाना पटोले एकदम ‘स्पोर्टी लुक’मध्ये दिसून आले.
साकोली तालुक्यातील खैरी-वलमाझरी ग्रामपंचायतीला आज भेट दिली. यावेळी गावाच्या विकासकामांची पाहणी, स्थानिक नागरिकांशी संवाद आणि ग्रामपंचायतीच्या उपक्रमांविषयी सविस्तर माहिती घेतली. pic.twitter.com/TehSJZKDmN
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 16, 2025
प्रदेशाध्यक्ष पद गेल्यानंतर नाना पटोले यांना काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदाची अपेक्षा होती. मात्र हे पद देखील पटोले यांना मिळालं नाही. विरोधकांनी त्यांच्यापासून ते हिरावून घेतले. विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना हे पद देण्यात आलं. त्यामुळे पटोले यांना काँग्रेस कोणती नवीन जबाबदारी देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. पद असो की नसो नाना पटोले मात्र फुल बिनधास्त मूडमध्ये आजही वावरत आहेत.