शहर झगमगतंय पण नाल्यांमध्ये. रस्ते डांबरी नव्हे, तलाव बनतायत. घरं गुदमरून ओलसर अंधारात आहेत आणि विकासाचा डंका ढगांमध्ये हरवला आहे. हे ‘स्मार्ट सिटी’चं स्वप्न आहे की ‘सॉरी सिटी’चं वास्तव? हे विचारत माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी नागपूर शहराच्या ‘विकास’ावरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.
हो, विकास झालाय… पण तो काही भागांपुरता सीमित. संपूर्ण नागपूरमध्ये विकासाचे फलित दिसत नाही. काही झोन झगमगताहेत, तर काही भाग अजूनही पाय मुठीत घेऊन जगताहेत, असा खणखणीत टोला राऊतांनी लगावला. पावसाळी अधिवेशनानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी नागपूरच्या विकासाचे वास्तव नागरिकांसमोर मांडले.
उपरोधिक सवाल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी या दोघांचेही ‘स्वप्ननगरी’ असलेल्या नागपूरची परिस्थिती पाहता, विकासाची भाषा केवळ जाहिरातीतच आहे, असा उपरोधिक सवाल राऊतांनी केला. जेव्हा शहरात बोट चालेल एवढं पाणी साचतं, तेव्हा नुसत्या इमारतींना स्मार्ट म्हणणं हे जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणं आहे, असा थेट आरोप त्यांनी केला.
Sudhir Mungantiwar : ठाकरे ब्रँड आता खपत नाही, शिव्यांशिवाय आवाजही निघत नाही
माजी महापौर संदीप जोशी यांनी काही दिवसांपूर्वीच महापालिकेच्या स्वच्छता यंत्रणेवर सवाल उपस्थित केले. त्यांच्यानंतर आमदार प्रवीण दटके यांनीही नालेसफाईच्या फसलेल्या मोहिमेवर बोट ठेवले. या घटनांचा संदर्भ देत राऊत म्हणाले, जे महापौर भाजपचे होते, जे आमदार आजही आहेत, तेच जर नागपूरच्या दयनीयतेची कबुली देत असतील, तर विरोधक म्हणून आम्ही प्रश्न विचारल्यावर रागावायचं कशाला?
पावसात रस्ते तलावासारखे
राऊत म्हणाले की, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमध्ये नागपूरचे पायाचं नव्हे तर कण्याचंही रक्षण होऊ शकलं नाही. अनेक भागांत घराघरात पाणी शिरलं. अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसात रस्ते तलावासारखे दिसू लागले. “ज्या शहरात वर्षागणिक पावसात बोट चालते, त्या शहराचा ‘स्मार्ट’ टॅग कशाच्या आधारावर आहे? आणि इतक्या कोट्यवधींच्या खर्चात पाणी घरात कसं शिरतं?” असा संतप्त सवाल त्यांनी केला. स्वच्छ सर्वेक्षणाच्या नुकत्याच आलेल्या अहवालानुसार नागपूरने स्वच्छतेत समाधानकारक कामगिरी केली नसल्याचं स्पष्ट झालं. या पार्श्वभूमीवर राऊत म्हणाले, जर सर्वेक्षणात नागपूर पिछाडीवर असेल आणि नागरिकांचे अनुभवही तसंच सांगत असतील, तर यामागे कोट्यवधींचा खर्च कुठे गेला, याची चौकशी झाली पाहिजे.
जलनाट्याची पुनरावृत्ती
2019 पासून दरवर्षी अतिवृष्टीनंतर नागपूर शहरात ‘नागनदी’ आणि ‘पिवळी नदी’चे पात्र वैनगंगा आणि गोदावरीसारखे होत आहे. पाणी इतकं साचतं की नागरिकांना घराबाहेर पडणं शक्य होत नाही. “आधीचे अनुभव पाहता दरवर्षीच्या जलनाट्याची पुनरावृत्ती ठरलेलीच आहे. पण या अनुभवातून शिकूनही महापालिका गप्प का बसते? की यांचं धोरणच आहे, काम न करण्याचं? असा उपरोध राऊतांनी व्यक्त केला. या सर्व संदर्भात नितीन राऊत म्हणाले, “मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री ज्या शहरातून आहेत, त्या नागपूरचीच ही अवस्था असेल, तर विदर्भातल्या आणि इतर भागातल्या शहरांची काय दुर्दशा होत असेल याची कल्पनाही नको!
शेवटी राऊतांनी थेट मागणी केली की, “नागपूर शहराच्या विकासाच्या नावाखाली उधळले गेलेले कोट्यवधी रुपये, स्वच्छतेच्या नावावर दिले गेलेले टेंडर, आणि नालेसफाईतील अपयश यामागे मोठा घोटाळा आहे. त्यामुळे राज्य शासनाने नागपूरच्या स्मार्ट सिटी योजनेतील निधीची व कामांची तातडीने चौकशी केली पाहिजे. नागपूरचा विकास केवळ कागदावर आणि जाहिरातबाजीच्या पोस्टरवर आहे, असं राऊत सूचित करतात. ‘डोळ्यांत धूर, रस्त्यांवर चिखल आणि घरात पाणी’, अशा अवस्थेत नागपूर आहे. आणि यामध्ये कोण जबाबदार? याचं उत्तर आता नागपूरकरांनी मागायला सुरुवात केली आहे.
