जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांचा एकेरी उल्लेख करत वक्तव्य केल्याने विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आता विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी नरेंद्राचार्य महाराज (Narendracharya Maharaj) यांच्या एका विधानावरून विजय वडेट्टीवार यांनी त्यांचा एकेरी उल्लेख केला होता. या विधानावरून राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. विशेषतः भाजपने या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेत वडेट्टीवार यांच्या विरोधात आंदोलन केले होते. मात्र, या सर्व प्रकारानंतर विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर पलटवार करत, त्यांच्या मौनावर सवाल उपस्थित केला आहे.
माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर प्रखर टीका करत मोठे विधान केले आहे. भाजपकडून स्वारगेट अत्याचार प्रकरणावर मौन बाळगले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न उपस्थित करत भाजपची द्विपद्री भूमिका उघड केली आहे.
Nagpur rural: ग्रामपंचायतींना वेठीस धरले, विकासाचे चाक थांबले
घणाघाती टीका
विजय वडेट्टीवार यांनी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर झालेल्या धक्कादायक अत्याचार प्रकरणावरून राज्य सरकार आणि गृहखात्यावर जोरदार हल्लाबोल केला. वडेट्टीवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक राहिलेला नाही. सरकारकडून गुन्हेगारांना अभय दिले जात आहे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील गृहखात्याचे पूर्णपणे अपयश समोर आले आहे.
वडेट्टीवार पुढे म्हणाले, स्वारगेट प्रकरणावर भाजपने का निषेध केला नाही? नरेंद्राचार्य महाराजांविषयी एकेरी उल्लेख केल्यामुळे माझ्यावर आंदोलन केले गेले, पण एका महिलेवर अत्याचार करणाऱ्यांवर भाजप आंदोलन करताना का दिसले नाही? छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राहुल सोलापूकर, प्रशांत कोरटकर, श्रीपद छिंदम यांच्यावर भाजपने आवाज का उठवला नाही? याचा अर्थ असा आहे की, भाजपची निष्ठा व्यक्ती, पक्ष आणि संघटनेवर आहे, महाराजांवर नाही, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
बदनामीवरून गप्प का?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामी करणाऱ्या नेत्यांचा मुद्दा उपस्थित करत विजय वडेट्टीवार यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. मी एकेरी भाषेत उल्लेख केला म्हणून माझ्या विरोधात आंदोलन करण्यात आले. पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जातो, तेव्हा भाजपकडून साधा निषेधाचा फलकही उचलला जात नाही. याचा अर्थ असा की, छत्रपतींची बदनामी करणाऱ्यांना भाजप अभय देते. कारण ते त्यांच्या पक्षाचे आहेत,” असा घणाघाती आरोप वडेट्टीवार यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना थेट सवाल करत वडेट्टीवार म्हणाले की, शिवाजी महाराजांची बदनामी करणारे विचार पुसण्याचे काम फडणवीस करतील का? श्रीपद छिंदम, राहुल सोलापूकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यासारख्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. मात्र, भाजपने त्यांच्या विरोधात कोणतीही कठोर कारवाई केली नाही. यावरून भाजपची भूमिका पक्षीय आणि जातीय असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.
वडेट्टीवारांचा इशारा
विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांना अभय देणाऱ्या भाजपच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरेल आणि महाराष्ट्रातील जनतेसमोर भाजपची खोटी हिंदुत्वाची भूमिका उघड करेल.
वडेट्टीवार यांनी भाजपवर कडाडून टीका करत म्हटले, ही माणसं बेईमान विचारांची आहेत. त्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांप्रती आदर नाही. ते केवळ आपला पक्ष, संघटना आणि जातीय मानसिकता जोपासण्याचे काम करत आहेत. अशा लोकांनी मला माफी मागण्यास सांगणे म्हणजे हास्यास्पद आहे.
विजय वडेट्टीवार यांच्या या घणाघाती टीकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर त्यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. स्वारगेट अत्याचार प्रकरण, छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी आणि गृहखात्याच्या अपयशावरून भाजपला लक्ष्य करत वडेट्टीवार यांनी आगामी काळात अधिक आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. राजकीय वर्तुळात आता यावर भाजप काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
