महाराष्ट्र

Pratibha Dhanorkar : घसा बसला, पण सरकार बधिर

Nagpur : 'वोट चोरी'चा नारा कामठीतून महाराष्ट्रभर पोहोचणार

Author

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक महिन्यांपासून मत चोरीचा वाद गाजत आहे. नागपूरहून सुरू झालेला हा वाद आता संपूर्ण राज्यभर मोर्चा घेऊन पसरत आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर गेल्या काही महिन्यांपासून मत चोरीचा गदारोळ चांगलाच रंगला आहे. 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने काँग्रेसला धूळ चारत सत्ता काबीज केली, पण काँग्रेसच्या गळ्यातला पराभवाचा काटा काही अजून निघालेला नाही. काँग्रेसकडून सातत्याने महायुती सरकारवर, विशेषतः भाजपवर मत चोरीचे गंभीर आरोप होत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तर पुराव्यांसह निवडणूक आयोग आणि भाजपवर मत चोरीचा ठपका ठेवला. हा वाद आता केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता थेट दिल्लीच्या राजकीय गल्लीत पोहोचला आहे. काँग्रेसने याविरोधात आंदोलनांचा धडाका लावला आहे.

3 सप्टेंबर 2025 रोजी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली ‘व्होट चोर गद्दी छोड’ मोर्चाने नागपूर कामठीच्या रस्त्यांवर धडक दिली. यावेळी काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी असे काही वक्तव्य केले, की सोशल मीडियावर हास्याचा फवारा उडाला. लोकसभेत महिनाभर बिहारच्या एसआयआर आणि मत चोरीच्या मुद्यावर चर्चा मागितली, पण सरकारला जागच आली नाही. ‘व्होट चोर गद्दी छोड’ म्हणत आमचा घसा बसला, पण सरकार झोपेतच आहे असं प्रतिभा धानोरकर यांनी ठणकावले. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये हशा पिकला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेली ही पदयात्रा कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत पोहोचली, जिथे भव्य मेळाव्याने वातावरण तापले.

Cabinet Decisions : मुख्यमंत्र्यांनी गृह नगराला दिली जागतिक ओळख

नवीन मतदारांची भर

राहुल गांधी यांनी सर्वप्रथम कामठी विधानसभा मतदारसंघाचा दाखला देत मत चोरीचा मुद्दा उपस्थित केला होता. याच मतदारसंघातून काँग्रेसने ‘व्होट चोर गद्दी छोड’ अभियानाची धडाक्यात सुरुवात केली. 3 सप्टेंबरला कामठी येथे आयोजित जाहीर सभेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राहुल गांधी यांनी यापूर्वी एका लेखात कामठी मतदारसंघातील मत चोरीचा दावा केला होता. तर कर्नाटकातील महादेवपूरा येथे मत चोरीचे पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन सादर करून खळबळ उडवून दिली. आता ते बिहारमध्ये ‘व्होट अधिकार यात्रे’च्या माध्यमातून एसआयआर विरोधात जनजागृती करत आहेत.

बिहारमधील या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, काँग्रेसने देशभरात हा मुद्दा तापवण्याची रणनीती आखली आहे. महाराष्ट्रातही काँग्रेसने आता विभागीय आणि जिल्हा स्तरावर व्होट चोर गद्दी छोडचा नारा गावोगावी पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. सभा, हस्ताक्षर मोहिमा, मशाल यात्रा यांच्या माध्यमातून हा आवाज बुलंद होणार आहे. कामठी येथील सभेने याची जोरदार सुरुवात झाली. विधानसभा निवडणुकीच्या अंतिम मतदार यादीत 35 हजार नवीन मतदारांची भर पडली. यापैकी 12 हजार मतदार शेवटच्या तीन दिवसांत वाढल्याचा आरोप पराभूत उमेदवार सुरेश भोयर यांनी केला.

Parinay Fuke : मराठा आरक्षणासोबत ओबीसी बांधवांचेही हित जपले

लोकशाहीचा मूळ गाभा

2024 लोकसभा निवडणुकीदरम्यान 32 लाख मतदार जोडले गेले, तर लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यांत 39 लाख नवीन मतदार कुठून आले, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राच्या मतदार संख्येपेक्षा जास्त मतदार कसे? निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर मिळाले नाही, असे त्यांनी ठणकावले. काँग्रेसचा हा लढा आता गावागावांपासून दिल्लीच्या सत्ताकेंद्रापर्यंत पोहोचला आहे. मत चोरीचा मुद्दा केवळ राजकीय आरोपांपुरता मर्यादित नसून, लोकशाहीच्या मूळ गाभ्याशी निगडित आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. कामठीपासून सुरू झालेला हा लढा आता मशाल यात्रा, हस्ताक्षर मोहिमा आणि जाहीर सभांच्या माध्यमातून राज्यभर पसरत आहे. हा लढा पुढे काय वळण घेतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!